विशेष प्रतिनिधी, नाशिक
सर्व विभाग प्रमुखांनी टिम वर्कने काम करून नाशिक जिल्ह्यात शासनाच्या ध्येय धोरणांची प्रभावी अंमलबजावणी केली, ही उल्लेखनीय बाब आहे. जिल्ह्यातील सर्व विभागांनी अशाच पध्दतीने काम केले तर आपला जिल्हा आदर्श म्हणून ओळखला जाईल, असे बोलून उपस्थित सर्व विभागाच्या प्रमुखांचे कौतुक सामान्य प्रशासन विभाग अपर मुख्य सचिव तथा नाशिक जिल्ह्याचे पालक सचिव आनंद लिमये यांनी केले आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात नाशिक जिल्ह्यातील सर्व विभागांची आढावा बैठक घेण्यात आली, त्या बैठकीत सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालकसचिव आनंद लिमये बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, पोलिस उप आयुक्त पौर्णिमा चौगुले, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्यासह संबंधित सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
पालक सचिव आनंद लिमये म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आपत्तीजनक परिस्थिती असतांनाही जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरीता सर्व विभागांनी समन्वयाने एकत्रित येवून वैशिष्ट्यपूर्ण कामे केली आहेत. तरीही संबंधित विभागांना काही अडचणी किंवा समस्या असतील तर तसे प्रस्ताव सादर करावेत. सदर प्रस्ताव जलदगतीने मार्गी लावण्यासाठी भर देण्यात येईल, असेही पालकसचिव श्री. लिमये यांनी यावेळी सांगितले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून काम करावे व पहिल्या लाटेतील सर्व माहितीचे दस्ताऐवजीकरण व्हावे यासाठी आढावा घेवून माहिती सादर करण्याबाबतच्या तसेच कर्मचाऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक होवून त्यांना जोमाने काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणुन वरिष्ठ पातळीवर त्यांचा सन्मान करण्यात यावा अशा सूचनाही पालक सचिव श्री. लिमये यांनी यावेळी संबंधितांना दिल्या आहेत.
कामांचा गतीने निपटारा करण्यास प्राधान्य
कोरोना काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या अनेक विभागाच्या कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याच्या दृष्टीने त्यांचे लसीकरण करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असली तरीही तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेत मिळावे यासाठी सर्वोतपरीने प्रयत्न केले जात असून मागील वर्षी पेक्षा यावर्षी आजपर्यंत 250 कोटी अधिक वितरण झाले आहे. बँकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी वेळोवेळी आढावा बैठकाही घेण्यात येत आहे. तसेच पावसाळ्यापुर्वी आपत्ती निवारणासाठी नियोजन करून रंगीत तालीमही घेण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी सांगितले आहे.
पुस्तिकेचे अनावरण
आपत्ती पुर्व व्यस्थापन नियोजनांतर्गत नागरीकांना माहिती देवून सतर्क करण्यासाठी तसेच आपत्ती संबंधित सर्व विभागांना एकत्रित जोडण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत पुर परिस्थितीतील लघुकृती आराखडा माहिती देणारी पुस्तिका तयार केली आहे. या पुस्तकामध्ये संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक आणि पत्ते देण्यात आले आहे. सदर पुस्तिकेचे अनावरण विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या उपस्थितीत सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा नाशिक जिल्ह्याचे पालक सचिव आनंद लिमये यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
सदर आढावा बैठकीत आरोग्य विभाग, नगरविकास विभाग, कृषी विभाग, वन विभाग, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग, शहरी व ग्रामीण पोलीस विभाग, पीक कर्जमाफी योजना, सहकार विभाग तसेच जिल्हा परिषदे अंतर्गत असणाऱ्या कामांचे व इतर संबंधित विभागांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले.