नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नियमानुकुल असलेल्या प्रकरणात शैक्षणिक कामकाजासाठी लागणारे जात पडताळणीचे दाखले जलद गतीने देण्याबरोबरच त्यासाठी भविष्यात जलदगतीने प्रकरणांचा निपटारा होण्यासाठी महाविद्यालयीन स्तरावरच प्रस्ताव स्वीकारावेत. तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी लागणारे जात पडताळणीचे दाखले शीघ्रगतीने निकाली काढण्यासाठी नियमानुसार कार्यवाही करण्याचे आवाहन आज राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागाच्या जातपडताळणी समित्यांच्या बैठकीत पालकमंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. सामाजिक न्याय विभागाच्या जात पडताळणी समितीचे अध्यक्षा तथा अपर जिल्हाधिकारी गितांजली बाविस्कर, आदिवासी विभागाच्या जात पडताळणीचे अध्यक्ष तथा सहआयुक्त विनोद पाटील, किरण माळी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, सामाजिक न्याय विभागाच्या जात पडताळणीच्या सदस्य सचिव प्राची वाजे, सहआयुक्त भगवान वीर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी उपायुक्त सुंदरसिंग वसावे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. भुसे म्हणाले की, जात पडताळणी समित्यांचे कामकाजाचे स्वरूप हे अर्धन्यायीक प्रक्रिया असून त्यांचे कामकाज हे जात प्रमाणपत्राच्या वैधता तपासून बोगस प्रमाणपत्रांची अवैधता समोर आणणयाचे आहे. यात कुठेही चुकीच्या व बेकायदेशीर
बाबींना पाठीशी न घालता जे प्रस्ताव नियमानुकुल व पुराव्यानिशी सिद्ध होणारे आहेत त्यावर तात्काळ निर्णय घेण्यात यावेत. सध्या विविध उच्चशिक्षण देणाऱ्या संस्थांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे, अशा परिस्थितीत जात प्रमाणपत्रांची वेळेत पडताळणी न झाल्याने अथवा त्याबाबतचा निर्णय प्रलंबित राहिल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी सर्व जात प्रमाणपत्र समित्यांनी घ्यावी. विषेषत: शैक्षणिक दाखले व निवडणुकांचे दाखले वेळेत निकाली कसे निघतील त्याबातचे नियोजन करणे आवश्यक आहे.
ते पुढे म्हणाले की, कुटुंबातील एका सदस्याकडे जात पडताळणी असल्यास त्याच्याच कुटुंबातील रक्तनातेसंबंधातील व्यक्तिला जात पडताळणी देण्या संदर्भात २४ नोव्हेंबर २०१७ चा नियम आहे, त्यानुसार योग्य निर्णय सर्व पडताळणी समित्यांनी घ्यावेत. अनावश्यक कागदपत्रांऐवजी आवश्यक तेवढ्याच कागदपत्रांची मागणी केल्यास प्रकरणांचा निपटारा जलद गतीने होण्याबरोबरच नागरिकांनाही ते सुलभ होईल. ग्रामपंचायत निवडणुक व शैक्षणिक दाखले यांना लागणाऱ्या दाखल्यांची निकड लक्षात घेवून सुटीच्या दिवशीही जात पडताळणी समित्यांचे कामकाज कसे सुरू राहील यासाठीचे नियोजन करण्याचे आवाहन यावेळी श्री.भुसे यांनी केले आहे.
Guardian Minister Review Meet of Cast Verification Certificate
Nashik Dada Bhuse