वादळी वाऱ्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान
नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश शासनाच्या वतीने दिले असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली.
शासनाने जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली आहे. पालकमंत्री डॉ. गावित यांनी तातडीने नंदुरबार तालुक्यातील कढरे, आसाने, वैंदाणे परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी आश्वासन दिले.
शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे. यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे व पंचनामे करावेत असेही निर्देश पालकमंत्री डॉ. गावित यांनी दिले. जिल्ह्यातील कढेरे, आसाने, वैंदाने सह जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या क्षेत्रात अवकाळी पाऊस झाला. अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.
उत्तर महाराष्ट्रासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने जिल्हयात बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीने पालकमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत. यावेळी नंदूरबारचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नंदुरबार तालुका कृषी अधिकारी स्वप्निल शेळके, कृषी पर्यवेक्षक सुधीर पाटील ,कृषी सहाय्यक सर्वश्री सतीश गिरासे कंडरे, बादल बंजारा, गजानन पाटील, सुवर्ण महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.
गारपीटीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान
धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास, पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी आज अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त झालेल्या साक्री तालुक्यातील टिटाणे, खोरी, पेटले, दुसाणे भागाची पाहणी केली.
साक्री तालुक्यातील काही भागात सोमवारी अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री. महाजन यांनी आज या भागाचा दौरा केला. यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार डॉ. हीना गावित, आमदार जयकुमार रावल, आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस. डी. मालपुरे, तहसीलदार श्री. चव्हाण के. यांच्यासह जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. महाजन यांनी अवकाळी गारपीटग्रस्त भागाची पाहणी करून तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याबाबतची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.
Guardian Minister Mahajan Gavit Dhule Nandurbar Tour Crop Loss