नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू अशी ओळख असलेल्या नाशिक वसंत व्याख्यानमालेचा येत्या मे महिन्यात शताब्दी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त स्थापित करण्यात आलेल्या स्वागत समिती अध्यक्षपदी राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दादा भुसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
नाशिकच्या गोदाघाटावरील देवामामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावर गेल्या 99 वर्षांपासून दि. 1 ते 31 मे असे सलग महिनाभर वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, स्वातंत्र्यवीर सावरकर, भारतरत्न लता मंगेशकर यांसारख्या महान विभूतींनी एक वेगळी प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेल्या या व्याख्यानमालेचे शताब्दी वर्ष माहे मे 2023 मध्ये भव्यदिव्य स्वरूपात साजरे करण्यात येणार आहे. त्याकरिता समाजाच्या विविध घटकातील प्रतिनिधींचा समावेश असलेली स्वागत समिती स्थापित करण्यासाठी आज सायंकाळी वसंत व्याख्यानामालेच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शताब्दी वर्ष महोत्सव स्वागत समिती अध्यक्षपदी ना. दादा भुसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
बैठकीच्या प्रारंभी व्याख्यानमालेचे माजी अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. त्यानंतर मालेचे उपाध्यक्ष विजय हाके यांनी प्रास्ताविकात सांगितले की, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी माहे मे 1905 मध्ये ही व्याख्यानमाला सुरू केली. 3 वर्ष ती सुरू होती. न्या. रानडे यांची नाशिकहून बदली झाल्यानंतर मालेचे कामकाज थंडावले. पुढे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांच्या प्रेरणेने कृष्णाजी वझे व त्यांच्या सहकाऱ्यांनी 1 मे 1922 रोजी व्याख्यानमाला पुनःश्च सुरू केली. संपूर्ण मे महिनाभर सुरू असणारी या व्याख्यानमालेचे कामकाज गेल्या 99 वर्षांपासून अखंड सुरू आहे.
मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी यावेळी सांगितले की माहे मे 2023 मध्ये वसंत व्याख्यानमालेचा शताब्दी वर्ष महोत्सव भव्यदिव्य स्वरूपात साजरे करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी उद्घाटन व समारोपाकरिता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यंदा व्याख्यानमालेत जगाच्या विविध देशांमध्ये उत्तुंग कामगिरी करणारे 10 विचारवंत आपले विचार मांडणार आहेत. त्याचबरोबर भारताच्या विविध राज्यातील 10 नामवंत वक्ते व्याख्यानासाठी येणार आहेत. स्थानिक कलावंत आणि विचारवंतांनादेखील संधी देण्यात येणार आहे.
यु ट्यूब, फेसबुक, केबल नेटवर्क, सोशल मिडिया याद्वारे व्याख्यानांचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या व्याख्यानामालेची किर्ती जगभरात पोहोचणार आहे. मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी स्वागत समिती अध्यक्षपदी दादा भुसे यांची निवड करण्याची सूचना मांडताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ना. दादा भुसे म्हणाले की, नाशिकची वसंत व्याख्यानमाला संपूर्ण भारत देशाचे भूषण आहे. त्यामुळे या व्याख्यानमालेचे शताब्दी वर्ष आपण सर्वजण अत्यंत उत्साहात आणि थाटात साजरे करू. यासाठी महाराष्ट्र शासन, नाशिक महानगरपालिका आणि नाशिककर नागरिक सर्वतोपरी आपले योगदान देतील. शताब्दी वर्षातील कार्यक्रमांची आठवण पुढील 25 वर्षे नागरिक काढतील एव्हढे सुंदर नियोजन आपण करणार आहोत.
यावेळी नरेडकोचे सेक्रेटरी सुनिल गवादे यांच्या हस्ते ना. दादा भुसे यांचा सत्कार करण्यात आला. चांदवड येथील श्री नेमीनाथ जैन शिक्षण संस्था प्रबंधक समितीचे अध्यक्ष अजित सुराणा यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल ना. भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार निशिगंधा मोगल, बाळासाहेब सानप, माजी महापौर दशरथ पाटील, माजी उपमहापौर अजय बोरस्ते, महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या प्रमुख वासंती दिदी, भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका शेफाली भुजबळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगरप्रमुख अंकुश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. मालेच्या चिटणीस संगिता बाफणा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी स्मृती व्याख्यान योजनेचे देणगीदार अविनाश गोठी, पुष्कर वैशंपायन, अरुण नेवासकर, सुलोचना हिरे, डॉ. शोभा नेर्लीकर, मंडलेश्वर काळे, नवलनाथ तांबे, गणेश भोरे, डॉ. विक्रांत जाधव, कुणाल देशमुख, विविध व्याख्यानमालांचे पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Guardian Minister Dada Bhuse Vasant Vyakhyanmala Chair Person