सोलापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नागुर (ता. अक्कलकोट) येथील नागोरे वस्तीमध्ये गावठाण वीजवाहिनी नसल्याने बसवराज प्रभू नागोरे यांच्या अडीच वर्षांपासून प्रलंबित घरगुती वीजजोडणीच्या मागणीला पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांच्यामुळे न्याय मिळाला. पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर नुकताच डीपी बसविण्यात आल्याने श्री. नागोरे यांना वीजजोडणी मिळाली.
श्री. नागोरे पूर्वी नागुर गावात राहायचे. साधारणतः अडीच ते तीन वर्षांपूर्वी ते नागोरे वस्तीवर राहायला आले. त्यामुळे घरगुती वीज जोडणी मिळावी म्हणून त्यांनी ७ जुलै २०२० रोजी महावितरणकडे अर्ज केला. गेली अडीच वर्षे ते पाठपुरावा करत होते. त्यांचे शेजारी बसवराज दनुरे यांच्यासोबत त्यांनी जिल्हा स्तरावर कार्यान्वित करण्यात आलेल्या पालकमंत्री संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून त्यांची व्यथा मांडली. तसेच, निवेदनाची प्रत पालकमंत्री यांना वैयक्तिकरीत्या पाठवली गेली. खुद्द पालकमंत्री श्री. विखे – पाटील यांनीच दखल घेतल्यामुळे त्यांच्या पाठपुराव्याला यश आले.
याबाबत श्री. नागोरे यांचे पुत्र पंकजकुमार नागोरे म्हणाले, पूर्वी आम्ही गावात राहायचे. साधारणतः तीन वर्षांपूर्वी नागोरे वस्तीत राहायला आले. तिथे घरगुती वीज नव्हती. विजेविना आमचे खूप हाल व्हायचे. त्यामुळे आम्ही घरगुती वीजजोडणी मिळावी, यासाठी पालकमंत्री संपर्क कार्यालयाशी संपर्क साधला. पालकमंत्र्यांनी आमच्या विनंतीची तात्काळ दखल घेत हा प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश महावितरणला दिले. गेल्याच आठवड्यात आमच्या वस्तीवर डीपी बसविला गेला आणि आम्हाला घरगुती वीजजोडणीही मिळाली. घरात वीज आल्यामुळे आमचे हाल आता संपलेत.
महावितरणचे उपअभियंता संजीवकुमार मेहेत्रे म्हणाले, श्री. नागोरे यांनी घरगुती वीजजोडणी मिळावी, अशा अर्ज केला होता. मात्र, नागोरे वस्तीमध्ये शेतीपंपाची लाईन होती. गावठाण वीजवाहिनी नसल्याने डीपी बसविणे आवश्यक होते. त्यासाठी विशेष घटक योजनेतून ४ लाख ६७ हजार रुपये शासकीय अनुदान मंजूर झाले. आता नागोरे वस्तीमध्ये गेल्या आठवड्यात १६ केव्हीएचा डीपी बसविला असून श्री. नागोरे यांना घरगुती वीज देण्यात आली आहे. नागोरे वस्तीवरील ग्राहकांना आता मागणीनंतर घरगुती वीज देता येऊ शकेल.
Guardian Minister Congizence Electric Connection