नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिक्षण व्यवस्थेत कालानुरूप बदल होत असून सुपर 50 उपक्रम हा त्यादृष्टीने महत्वाचा टप्पा ठरणार आहे. येणाऱ्या काळात नाशिक जिल्हा शैक्षणिक हब होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
सैय्यद पिंप्री येथील उपाध्ये कला व विज्ञान महाविद्यालयातील सुपर 50 प्रशिक्षण केंद्राची पाहणी करत पालकमंत्री दादाजी भुसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपाध्ये संस्थेचे संचालक विनोद टाकेकर यांच्यासह शिक्षक व सुपर ५० मध्ये निवड झालेले विद्यार्थी उपस्थित होते.
पालकमंत्री दादाजी भुसे यावेळी म्हणाले, पालघरला सुपर 50 उपक्रम यापूर्वी यशस्वी झाला असून त्याच धर्तीवर जिल्हा परिषदेमार्फत हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून जीवनात यशस्वी होण्याची संधी प्राप्त झाली असून या संधीचे सोने करून विद्यार्थी शैक्षणिक जीवन यशस्वी करून दाखविणार यात शंका नाही. येणाऱ्या काळात सुपर 50 संख्या शंभर व दोनशेच्या पुढे गेली पाहिजे अशी अपेक्षा यावेळी पालकमंत्री यांनी यावेळी व्यक्त केली.
पालकमंत्री श्री. भुसे पुढे म्हणाले, गुणवत्तेच्या आधारे सुपर 50 उपक्रमासाठी विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. आपल्या कुटुंबासोबतच समाजिक उन्नतीसाठी विद्यार्थ्यांना खडतर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. विद्यार्थ्यानी अभ्यासासोबतच व्यावहारीक ज्ञान, वकृत्व, वाचन, लिखाण, काव्य, चित्रकला, खेळ, अभिनय यातही नैपुण्य आत्मसात करावे. उपक्रमात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या सर्व अडचणी या प्राधान्याने सोडविण्यात येतील. आपला आदर्श घेवून इतर विद्यार्थीही पुढे येतील यादृष्टीने अभ्यास करून यशस्वी होण्याच्या शुभेच्छा पालकमंत्री यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिल्या. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी विद्यार्थ्यांचे वसतिगृह, खानावळ, ग्रंथालय तसेच स्वच्छता गृहांची पाहणी केली. यावेळी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
Guardian Minister Bhuse Nashik Education Hub