नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दक्षिणेकडील राज्यात कलावंतांना देवाप्रमाणे मानतात इतके की त्यांना मुख्यमंत्री करतात परंतु मराठी माणूस मराठी माणसांना मोठं करण्यात कमी पडतो अशी खंत व्यक्त करतांनाच आयुष्यात निर्मळ मनाने केलेले कार्य यशास प्राप्त ठरते. कारकिर्दीत प्रामाणिकपणा आणि जिद्द यांची सांगड घातल्यास कोणतेही काम अवघड नाही, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. नाशिकमध्ये पार पडलेल्या सुविचार पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. गंगापुर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजीत या पुरस्कार वितरण सोहळयाप्रसंगी जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय, सुविचार मंचचे अध्यक्ष अशोक खुटाडे, सचिव अॅड. रविंद्र पगार, संयोजक आकाश पगार उपस्थित होते.
अभिनेते सिध्दार्थ जाधव, पुजा सावंत, अभिनेते चिन्मय उदगीरकर या पुरस्कार सोहळयाचे प्रमुख आकर्षण ठरले. मान्यवरांच्या यावेळी अभिनेते तसेच विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणारया मान्यवरांचा सुविचार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलतांना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी अभिनेते सिध्दार्थ जाधव यांच्या भाषणातला धागा पकडत म्हणाले, दिसण्यावर काहीच नसतं तर माणसाच्या असणं महत्वाचे आहे. व्यासपीठावरील मराठी कलाकारांचा गौरव करतांना त्यांनी सांगितले की, दक्षिणेकडे अभिनेत्यांना मुख्यमंत्री करतात परंतू आपण आपल्या माणसांना मोठ करण्यात कमी पडतो. आपण प्रेम, व्देष राखून करतो. परंतू खरेपणाने यश नक्कीच मिळतं असे सांगत त्यांनी पुरस्कार्थींचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष छगन भुजबळ म्हणाले की, आज सर्वच क्षेत्रात सुविचार दुर्मिळ होत चालला आहे. अशा परिस्थितीत सुविचार मंचने आपल्याच माणसांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला आहे, ही गोष्ट प्रेरणादायी आहे. कार्यक्रमाच्या सुरूवातीला विविध मनोरंजनपर कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. रविंद्र पगार यांनी केले. सुत्रसंचालन संयोजक आकाश पगार यांनी केले. यावेळी आमदार हिरामण खोसकर, आमदार माणिकराव कोकाटे, माजी खासदार समीर भुजबळ, देविदास पिंगळे, डॉ. शोभा बच्छाव, अशोक खुटाडे आदी उपस्थित होते.
याचां झाला सन्मान
नितीन महाजन (प्रशासन), प्रा. शंकर कापडणीस ( साहित्य), ईश्वरी सावकार (क्रीडा), मधुकर कडलग (शिक्षण), किशोर खैरनार (कृषी), डॉ. अतुल वडगावकर ( वैद्यकीय), हेमंत राठी (उद्योग), चिन्मय उद्गीरकर (कला), पूजा सावंत (कला), सिद्धार्थ जाधव ( कला) यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नाशिक जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ, सुविचार मंचचे अध्यक्ष ड. अशोक खुटाडे, सचिव ॲड. रवींद्र पगार, प्रमुख पाहुणे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, समीर भुजबळ, आ. माणिकराव कोकाटे, आ. हिरामण खोसकर, दीपिका चव्हाण आदी उपस्थित होते.
पालकमंत्री भुजबळांचा आयुक्तांना टोला
आपल्या खास शैलीत भाषण करतांना पालकमंत्री भुजबळ यांनी दूरसंचार क्षेत्र आणि पोलीस आयुक्तांवर कोटी केल्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला. भुजबळ म्हणाले, नाशिकच्या नितीन महाजन यांनी नाशिक दूरसंचार देशात एक क्रमांकावर आणले आहे. मात्र केंद्र सरकारने रेल्वे, विमान कंपनीचे खासगीकरण केले. अगदी अलीकडेच विमान कंपनीही गेली. त्यामुळे ते दूरसंचारही केव्हा विकतील, याचा नेम नाही असा टोला हाणला. अर्थात दिल्लीकरांची कृपादृष्टी असल्याशिवाय ते शक्य नाही ही भावना तिथपर्यंत पोहचवा असेही ते म्हणाले. तर दररोज गोदावरीत स्नान करणारया आयुक्तांना गोदा प्रदुषणमुक्त करण्यासाठी हातभार लावा अन रामकुंडात स्नान करा असा टोलाही त्यांनी हाणला.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, अविचार न करता सुविचार करा असा संदेश देत ‘सुविचार मंच’ नाशिक ही सामाजिक क्षेत्रात निरपेक्षपणे काम करणारी संस्था असून लोकमनाच्या सुखदु:खात सहभागी होऊन त्यांना भावनिक आधार देण्याचे काम करत आहे.संस्थेच्या माध्यमातून युवकांची मोठी फळी काम करत असून आकाश पगार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो विद्यार्थी युवक गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी ‘देव द्या देवपण घ्या’ हा अतिशय महत्वपूर्ण कार्यक्रम राबवीत आहे.ही अतिशय गौरवाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. समाजासाठी अविरतपणे झटणाऱ्या सर्वसामन्यांमधील आदर्श व्यक्तींना पुरस्काराने सन्मानीत करून त्यांचे कार्य समाजापुढे आणण्यासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तिंना सुविचार गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. नाशिकची सर्व नवरत्न असून नाशिक कला, साहित्य, क्रीडा क्षेत्रात अतिशय अग्रेसर आहे.
जयंत पाटील म्हणतात केसावर फुगे
जलसंपदामंत्री जयंत पाटील हे भाषणासाठी उभे राहीले. भाषणाला सुरूवात करतांना त्यांनी अभिनेता सिध्दार्थ जाधव याचे कौतुक केले. तसेच जाधव यांनी आपण दिसायला फार चांगले नाही असा उल्लेख केला हा धागा पकडत आपण दिसायला चांगले नाहीत असे कोण म्हणतो आपण जी हेअर स्टाईल केली आहे तिचे मला फार आकर्षण वाटते असे सांगत आपल्या केसावर जो फुगा आला आहे त्याला मला हात लावूशी वाटतो असे सांगताच सिध्दार्थ जाधवनेही आपल्या जागेवर उठून पाटील यांच्याकडे धाव घेतली यावेळी सिध्दार्थच्या केसावरील फुग्याला जाधव यांनीहात लावताच सभागृहात एकच हशा पिकला.
यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, सुविचार मंचने सुविचार गौरव पुरस्काराची परंपरा कायम ठेवली आहे. ही अतिशय महत्वपूर्ण बाब आहे. अतिशय कल्पकतेने आकाश पगार यांनी हा सोहळा आयोजित केला ही कौतुकास्पद बाब असून इतक्या मान्यवरांवर एका व्यासपीठावर आणले हे सुविचार मंचचे यश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आम्ही मराठी माणसे मराठी कलाकारांना पुढे आणण्यात कमी पडतो आहे. इतर राज्यात कलाकारांना अधिक प्रेम दिलं जातंय. आम्ही मराठी माणूस हात राखून काम करतो अशी खंत असून सिद्धार्थ जाधवचे यश महाराष्ट्रात अतिशय मोठं असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अभिनेता सिद्धार्थ जाधव सत्काराला उत्तर देतांना म्हणाला की, मनुष्याकडे जे नसते, त्याचा बाऊ न करता जे आहे, त्याकडे लक्ष दिले तर अधिक यश मिळते. या मोहमयी जगात आकर्षक काहीही शाश्वत नसते. तुमचा स्वभाव आणि दुसर्यास आदर देणारी वृत्ती हेच तुमचे सौंदर्य असते. आई वडिलांचे आशीर्वाद घेत एकलव्याप्रमाणे सातत्याने काम केल्यास नक्कीच यश मिळते.
अभिनेता चिन्मय उदगीरकर* याने आपण नाशिककर असल्याचा अभिमान असल्याचे सांगत कलाकार म्हणून काम करत असतांना या शहरासाठी आपण काही तरी देणे लागतो याकरीता नमामि गोदा उपक्रम राबवत असल्याचे सागत नाशिकमध्ये चित्रनगरी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. गेली १२ वर्षे चित्रपटसृष्टीत काम करत असतांना आज नाशिककरांनी मला जे प्रेम दिल त्याची ॠणी असून सुविचार गौरव पुस्काराने जबाबदारी वाढली असून मला बळ मिळाल्याचे अभिनेत्री पुजा सावंत हिने सांगितले. यावेळी बोलतांना त्यांनी चित्रपटसृष्टीतील आपला प्रवास उलगडवून सांगतांना आपले अनुभव कथन केले.