नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर महासंचालनालयाच्या गुरुग्राम क्षेत्रीय विभागाने मोठी कारवाई केली आहे. ४६१ बनावट कंपन्यांचा सहभाग असलेले एक मोठे फसवे आयटीसी अर्थात इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेट उघडकीस आणले आहे. ८६३ कोटी रुपयांच्या अवैध आयटीसी मंजुरीचे हे प्रकरण आहे. याप्रकरणी आतापर्यंत दोन प्रमुख हस्तकांना अटक झाली आहे.
गैरव्यवहार करण्यासाठी गुप्त कार्यालयाविषयीची खबर गुप्तचर विभागाकडून मिळाल्यानंतर शोध घेण्यात आला तेव्हा या फसवणुकीचा छडा लागला. या कार्यालयात सापडलेल्या लॅपटॉपमध्ये भाडे करार, वीजबिल, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड इत्यादी कागदपत्रांच्या बनावट सॉफ्ट कॉपीज आढळून आल्या. या कार्यालयातून जप्त करण्यात आलेले लॅपटॉप, उपकरणे यांच्या फॉरेन्सिक तपासणीनंतर कारवाई करण्यात आली. धातू/लोह आणि पोलाद क्षेत्रात जिथे मोठ्या प्रमाणावर करचुकवेगिरी होते त्या क्षेत्रात हे बनावट आयटीसी पोहोचले आहे.