मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लाच घेण्यासाठी संपूर्ण जगात ऑनलाईन मार्ग निवडले जात असतानाही अधिकाऱ्यांनी आजही पारंपरिक पद्धती सोडलेल्या नाहीत. पण त्यातही नवनवे प्रयोग करणारे अधिकारी आपल्याकडे आहेत, याची प्रचिती देणारी घटना अलीकडेच घडली. एकाने लाच घेण्यासाठी चक्क कॅलक्युलेटरचा वापर केला आहे.
अधिकाऱ्यांना टेबलाखालून खर्चपाणी दिल्याशिवाय काम होत नाही, असे बोलले जाते. पण एका अधिकाऱ्याने चक्क टेबलावर ठेवलेल्या कॅलक्युलेटरचा वापर लाच मागण्यासाठी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जीएसटी विभागातील अधिकाऱ्याने हा प्रताप केला आहे. एका व्यापाऱ्याकडून लाच घेण्यासाठी या अधिकाऱ्याने हा मार्ग अवलंबला. दोघांमध्ये झालेला संवादही व्हायरल झाला आहे. दोन कोटींचे बोलणे झाले आहे, असे हा व्यापारी अधिकाऱ्याला सांगत आहे. त्यात अशा गोष्टी कुठे जाहीरपणे बोलायच्या नसतात, असे हा अधिकारी त्याला सांगतोय. शेवटी काय… अधिकाऱ्याने नवीन शक्कल लढवली आणि व्यापाऱ्यापुढे कॅलक्युलेटर ठेवले. त्यावरच सारा खेळ खेळला गेला.
संपूर्ण डील कॅलक्युलेटरमध्ये आकडे टाकून करण्यात आले. दोन कोटींवरून सुरू झालेली बोलणी एक कोटीवर येऊन थांबली. कॅलक्युलेटरही थकून गेले असेल एवढ्यांदा आकडे टाकण्यात आले. पण हे डील ठरवताना अधिकाऱ्याने एका एपची मदत घेतली. बोटीम नावाचे एप डाऊनलोड करून त्यावरून पुढची बोलणी करण्याची शक्कल अधिकाऱ्याने लढवली होती.
अधिकाऱ्याचा बॉसही सामील
अधिकारी राहूलकुमार याच्यासोबत त्याचा बॉसही या डीलमध्ये अप्रत्यक्षरित्या सहभागी होता. त्याचा बॉस अर्थात पुण्यात जीएसटी विभागात कार्यरत उपसंचालक विमलेशकुमार सिंह याच्याही विरोधात व्यापाऱ्याने तक्रार केली आहे. स्वतः व्यापाऱ्यानेच सीबीआयकडे तक्रार केली.
सीबीआयने रचला सापळा
व्यापाऱ्याने केलेली तक्रार तपासून बघण्यासाठी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्याच्या हाताच्या मागे छोटा डिजीटल रेकॉर्डर लावला आणि पुन्हा एकदा अधिकाऱ्याकडे पाठवले. तिथे राहुलकुमारची पोलखोल झाली. आणि त्यानंतर अधिकाऱ्याला अटक करण्यात आली.
GST Officer Bribe Corruption New Funda CBI Officers