मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय वस्तू आणि सेवाकराच्या मुंबई पश्चिम आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी 16.32 कोटी रुपये मूल्याच्या वस्तू आणि सेवाकर इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेट उघडकीस आणले आहे. केंद्रीय गुप्तवार्ता युनिटकडून मिळालेल्या माहितीवरून, अधिकाऱ्यांनी मेसर्स हृतिक केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक असलेल्या एका व्यावसायिकाला अटक केली आहे. आझाद नगर, अंधेरी पश्चिम, मुंबई येथे स्थित लि. ही फर्म हायड्रोकार्बन्स आणि ऑरगॅनिक केमिकल्स इत्यादींच्या व्यापारासाठी जीएसटीअंतर्गत नोंदणीकृत आहे आणि सीजीएसटी कायदा 2017 तरतुदींचे घोर उल्लंघन करत , वस्तू किंवा सेवा न मिळवता 16.32 कोटी रुपये मूल्याचे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवून ते वापरले होते.
केंद्रीय वस्तू आणि सेवाकर कायदा 2017 च्या कलम 132 चे उल्लंघन केल्याबद्दल सीजीएसटी कायदा 2017 च्या कलम 69 अन्वये या संचालकाला अटक करण्यात आली आणि त्यानंतर अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, एस्प्लेनेड, मुंबई यांच्यासमोर त्याला हजर केले. न्यायालयाने त्याला 23 मार्च पर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे . ही कारवाई केंद्रीय वस्तू आणि सेवाकर, मुंबई पश्चिम आयुक्तालयाच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट नेटवर्क्सचा पर्दाफ़ाश करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून गेल्या सहा महिन्यांत मुंबई पश्चिमने 396.84 कोटी रुपयांच्या जीएसटी बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेट घोटाळा उघड करत 28.65 कोटी रुपये वसूल केले. येत्या काही दिवसांत हा विभाग फसवणूक करणार्या आणि कर चुकवेगिरी करणार्यांच्या विरोधातील मोहीम अधिक तीव्र करणार असल्याची माहिती विभागाने दिली आहे.