इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशातील सुमेरपूरमध्ये असलेल्या गुटखा व्यापाऱ्यावर जीएसटी विभागाने छापा टाकला खरा पण या छाप्यात गवसलेले घबाड बघून अधिकाऱ्यांचेच डोळे पांढरे झाले आहेत. या व्यापाऱ्याने जीएसटीची रक्कम चुकविल्याचा संशय विभागाला होता. त्यामुळेच विभागाच्या अधिकाऱ्यांनी जगत गुप्ता या गुटखा व्यापाऱ्याच्या बंगल्यावर धाड टाकली. अधिकाऱ्यांचे पथक घरात आले. तेव्हा त्यांनी एकेका खोलीची कसून तपासणी केली. जेव्हा अधिकारी व्यापाऱ्याच्या बेडरुममध्ये आले तेव्हा त्यांना संशय आला. त्यांनी बेडची कसून तपासणी केली असता हा संपूर्ण बेड नोटांनी भरला असल्याचे दिसून आले. एवढी मोठी रोख रक्कम पाहून अधिकाऱ्यांनी तोंडात बोट घातले.
त्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने नोटा मोजण्याचे मशीन बोलवले. मात्र, एका मशिनने काही झाले नाही म्हणून तब्बल तीन मशीन आणल्या. या सर्व नोटांची मोजणी पूर्ण केली असता या व्यापाऱ्याकडे तब्बल ६ कोटी ३१ लाख ११ हजार रुपये रोख असल्याचे दिसून आले. या नोटा ठेवण्यासाठी ३ मोठ्या लोखंडी पेट्या मागविण्यात आल्या. विशेष म्हणजे, तब्बल १७ अधिकाऱ्यांचे पथक या बंगल्यामध्ये केवळ एक-दोन तास नाही तर १७ तास संपूर्ण छाननी करीत होते. आता जीएसटी विभागाने गुप्ताच्या सर्वच व्यवहारांची पडताळणी करण्याचे निश्चित केले आहे. जीएसटीची अनेक कागदपत्रे गुप्ताने लपविल्याचेही जीएसटी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे.