मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वस्तू आणि सेवा करातील (जीएसटी) घोटाळाप्रकरणी ठाणे जीएसटी विभागाने निर्यातदाराला अटक केली आहे. बनावट कंपन्यांच्या नावाच्या सुमारे 85 कोटी रुपयांच्या बनावट पावत्या तयार करून या कंपनीने बेकायदेशीररीत्या 15 कोटी 26 लाख रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडीट मिळवत होती. दिल्ली सीमा शुल्क विभागाकडून मिळालेली माहिती आणि ठाणे आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशी अंती मे. कॉर्वेट ट्रेडलिंक या बोरिवलीच्या खासगी कंपनीविरुद्ध चौकशी मोहीम सुरु करण्यात आली. सखोल तपासावरून असे दिसून आले की, ही कंपनी पादत्राणांच्या निर्यातीचे व्यवहार करत असून, या कंपनीने, दिल्लीमध्ये अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या नावाने जारी केलेल्या बनावट पावत्यांचा वापर करून जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडीट (आयसीटी) मिळविले. दिल्लीतील तुघलकाबाद आयसीडीच्या माध्यमातून निर्यात मालाच्या आयजीएसटी भरणा केल्याचे भासवून त्यावरील आयसीटी वर भारतीय सीमा शुल्क विभागाकडून मिळणारा आयजीएसटी परतावा स्वतःच्या ताब्यात घेतला. या खासगी कंपनीच्या एका संचालकाला अटक करण्यात आली. सीजीएसटी कायद्याच्या कलम 69 अंतर्गत, आणि सीजीएसटी कायदा 2017 मधील कलम 132(ब) आणि 132(क) अंतर्गत त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. या संचालकाला मुंबई न्यायदंडाधिकाऱ्यांंसमोर हजर करण्यात आले. त्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी दोषी आढळल्यास त्याला 5 वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होईल.
कर-चुकवेगिरीविरुद्ध तसेच बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्यांविरुद्ध मुंबई प्रदेशाच्या सीजीएसटी विभागाने सुरु केलेल्या विशेष मोहिमेचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली. ठाणे सीजीएसटी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांच्या काळात करचुकवेगिरीच्या प्रकरणांमध्ये 1238 कोटी रुपयांची कर चोरी उघडकीस आणली आणि त्यातील 20 कोटी रुपये वसूल केले, तसेच या संदर्भात 7 व्यक्तींना अटक देखील केली. करचुकवेगिरी करणाऱ्यांना आणि बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्यांना शोधून काढण्यासाठी सीजीएसटी विभाग डेटा मायनिंग, डेटा अनॅलिटीक्स आणि नेटवर्क विश्लेषण यांसारख्या साधनांचा वापर करत आहे. सीजीएसटी विभाग सेवा, आयात आणि निर्यात यासारख्या अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांसह डिजिटल अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करून,कर चुकवेगिरी करणाऱ्यांचा शोध घेत आहे. येत्या काळात सीजीएसटी विभाग कर चुकवेगिरी करणाऱ्यांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करणार आहे.