मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून २७ कोटींहून अधिक रकमेच्या बोगस कर परताव्या संदर्भातील घोटाळा उघडकीस आला आहे. याप्रकरणी रहमत अली मोमीन (वय २६) या तरुणाला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने सन २०२२-२३ मधील केलेल्या कार्यवाही पैकी ही ४८ वी अटक आहे.
मे. फ्लोवेज मार्केटिंग (ओपीसो) प्रायव्हेट लिमिटेड आणि मे. आऊटसोर्स ऑप्टिमायझेशन (ओपीसी) प्रा.लि. या कंपन्यांबाबत वस्तू व सेवा कर विभागाकडून अन्वेषण कार्यवाही सुरू करण्यात आली होती. या संदर्भातील तपासात या कंपन्याची निर्मीती आणि कामकाज चालवणाऱ्या सूत्रधारांपैकी रहमत अली मोमीन ही एक व्यक्ती असल्याचे आढळून आले. हा आरोपी या कंपन्यांचा एकमेव संचालक असून त्याने २३८ कोटी रूपयांची बोगस देयके जारी केली असून या आरोपीने २७.२० कोटी रूपयांपेक्षा जास्त रकमेचा जीएसटी परतावा प्राप्त केला होता. याप्रकरणातील आणखी काही सूत्रधारांचा तपास सुरू आहे.
महानगर दंडाधिकाऱ्यांनी या व्यक्तीस १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कार्यवाही अन्वेषण क विभागाच्या सहायक राज्यकर आयुक्त रूपाली काळे, अजित विशे, श्रीनिवास राऊत, बाळकृष्ण क्षिरसागर आणि बापुराव गिरी यांनी संयुक्तपणे राबवली आहे.ही संपूर्ण कार्यवाही महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागातील अन्वेषण- क विभागाचे राज्यकर उपायुक्त, दिपक गोजमगुंडे व अनिल भंडारी (भा.प्र.से.), राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण-क यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
GST Department arrest 48 Peoples in 10 Months
Maharashtra Crime Tax