मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाने कर चुकवणाऱ्या फर्मविरुद्ध केलेल्या विशेष चौकशी मोहिमेअंतर्गत २५ सप्टेंबर २०२५ रोजी मेसर्स नीलकंठ ट्रेडर्स या फर्मचे मालक सुरेश शिवजी कटारिया, वय-५६ वर्षे यांना अटक केली असल्याचे मुंबई माझगांव येथील राज्य कर उपायुक्त (जनसंपर्क) कार्यालयाचे राज्य कर उपायुक्त (जनसंपर्क) जनार्दन आटपाडकर यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.
बनावट इनव्हॉइसमध्ये सहभागी असलेल्या करदात्याविरुद्ध मेसर्स नीलकंठ ट्रेडर्सच्या बाबतीत चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान, असे आढळून आले की, सुरेश शिवजी कटारिया यांनी वस्तूंच्या कोणत्याही व्यवहाराशिवाय, अस्तित्वात नसलेल्या करदात्यांकडून १०.५३ कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवले आहे.
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, एस्प्लेनेड मुंबई यांनी सुरेश शिवजी कटारिया यांना १० ऑक्टोबर २०२५ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राज्य कर विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष आर. खेडकर, श्रीमती दिप्ती एन. पिलारे यांनी राज्य कर निरीक्षक/कर सहाय्यकांसह, ही कारवाई केली.
ही मोहीम, राज्यकर सहआयुक्त अन्वेषण-क विभाग, मुंबई व अन्वेषण-क विभाग, मुंबईचे राज्यकर उपायुक्त यास्मीन अ. मोळकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.
वित्तीय वर्ष २०२५-२६ मधील ही ३० वी अटक असून, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने पुन्हा एकदा कर चोरी करणाऱ्या व्यक्ती, वस्तू किंवा सेवांचा प्रत्यक्ष व्यवहार न करता फसव्या नोंदी दाखवणाऱ्या, बनावट चलने तयार करणाऱ्या व खोटी इनपुट टॅक्स क्रेडिट घेणाऱ्या व दुसऱ्यांना देणाऱ्या व्यक्तींना कठोर इशारा दिला आहे.