मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाने मेसर्स मॅजिक गोल्ड बुलियन प्रायव्हेट लिमिटेड विरोधात केलेल्या तपासानंतर करचोरी करणाऱ्यांविरुद्ध राबविण्यात आलेल्या विशेष कारवाईअंतर्गत ११ ऑगस्ट रोजी मेसर्स मॅजिक गोल्ड बुलियन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक यशवंत कुमार नारायणलाल टेलर (३३) यांना अटक केली.
या तपासादरम्यान मिळालेली माहिती अशी क, करदात्याने ३०.५१ कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान केले आहे. वस्तूंचा प्रत्यक्ष पुरवठा न करता इनव्हॉइस किंवा बिले जारी करणाऱ्या पुरवठादारांकडून करदात्याने चुकीच्या पद्धतीने इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवणे किंवा वापरणे अशा फसवणुकीच्या कारवायांमध्ये सहभाग होता, त्याने एमजीएसटी कायदा/सीजीएसटी कायदा/आयजीएसटी २०१७ च्या तरतुदी किंवा त्याअंतर्गत नियमांचे उल्लंघन करून इनपुट टॅक्स क्रेडिट चुकीच्या पद्धतीने मिळवले किंवा वापरले आहे.
मुंबईच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राज्य कर, अन्वेषण-अ, मुंबईच्या सहाय्यक आयुक्त निशिगंधा खेडकर, चंदर टी. कांबळे, राजेश बदर आणि डी. के. शिंदे यांनी राज्य कर निरीक्षकांसह राज्य कर सहआयुक्त प्रेरणा देशभ्रतार (आयएएस), आणि राज्य कर, अन्वेषण-अ, मुंबईचे उपआयुक्त अनिल कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास केला.
ऑनलाइन टूल्स बीआयएफए आणि जीएसटी प्राइमच्या मदतीने आणि इतर विभागांच्या समन्वयाने, महाराष्ट्र जीएसटी विभाग करचोरी करणाऱ्यांविरोधात युद्धपातळीवर कारवाई करत आहे. या अनुषंगाने करण्यात आलेल्या १५ व्या अटकेसह महाराष्ट्र जीएसटी विभागाने करचोरी करणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे की विभाग गुन्हेगारांना पकडण्यात कोणतीही कसर सोडणार नाही.