मुंबई – वस्तू आणि सेवा कर न भरणे आणि आयटीसी अर्थात इनपुट टॅक्स क्रेडिटचा फसवून लाभ घेतल्याचे ७८ कोटी रुपयांचे प्रकरण, मुंबई क्षेत्रातील सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा कराच्या भिवंडी आयुक्तालयाने गुप्त माहितीच्या आधारे उघड केले आहे. GSTIN 27ABLFA4344D1ZM असलेल्या मे. ए. एस. ऍग्री अँड ऍक्वा एलएलपी विरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. या फर्मची (इतर १६ भागीदारांसह) स्थापना केलेल्या फर्मच्या ३ भागीदारांना सीजीएसटी कायदा, २०१७ च्या कलम १३२ चे उल्लंघन केल्याबद्दल ७ ऑगस्ट रोजी तपासादरम्यान गोळा केलेल्या सबळ पुराव्यांच्या आधारे सीजीएसटी कायदा, २०१७ च्या कलम ६९ अंतर्गत अटक करण्यात आली. त्यांना १२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
या फर्मने, पॉली हाऊसच्या बांधकामासाठी कार्य अनुबंध सेवेच्या प्राप्तकर्त्यांकडून प्राप्त २९२ कोटी रुपयांच्या आगाऊ देय रकमेवर, ५३ कोटी रुपयांचा जीएसटी भरलेला नाही, जो सीजीएसटी कायदा, २०१७ च्या कलम १३(२ )(ब) अंतर्गत करपात्र आहे. याशिवाय, या फर्मने सीजीएसटी कायदा, २०१७ च्या कलम १७(५)(सी) च्या तरतुदींनुसार उपलब्ध नसलेल्या स्थावर मालमत्तेच्या बांधकामासाठी कार्य अनुबंध सेवेवर फसवणूक करून २५ कोटी रुपयांच्या आयटीसीचा लाभ घेतला आहे.
ही कारवाई, सीजीएसटी मुंबई क्षेत्राने कर चुकवेगिरी आणि बनावट आयटीसी जाळ्याविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग आहे. आतापर्यंत सीजीएसटी भिवंडी आयुक्तालयाने गेल्या वर्षभरात १४ जणांना अटक केली आहे. सीजीएसटी अधिकारी संभाव्य फसवणूक करणार्यांना ओळखण्यासाठी आणि त्यांचा शोध घेण्यासाठी डेटा विश्लेषण आणि नेटवर्क विश्लेषण साधने वापरत आहेत. करचोरी करणाऱ्यांविरुद्धची ही मोहीम सीजीएसटी अधिकारी येत्या काही दिवसात अधिक तीव्र करणार आहेत.