नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारताच्या स्वच्छ ऊर्जेच्या भविष्याकडे एक ऐतिहासिक पाऊल टाकत, कांडला येथील दीनदयाळ बंदर प्राधिकरणाने (डीपीए) आज 1 मेगावॅट हरित हायड्रोजन कारखाना सुरू केला. या अग्रगण्य सुविधेचे उद्घाटन केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केले.
सोनोवाल यांनी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनच्या माध्यमातून “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2030 च्या संकल्प पूर्ततेसाठी एक मोठे पाऊल” म्हणून या विकासाचे कौतुक केले.
हा टप्पा म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखालील भारताच्या हरित परिवर्तनाचे एक शक्तिशाली प्रतीक आहे आणि तो निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्यासाठी देशाच्या वचनबद्धतेला बळकटी देतो.
भुज येथे 26 मे 2025 रोजी दिलेल्या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी 10 मेगावॅट क्षमतेच्या हरित हायड्रोजन कारखान्याची पायाभरणी केली होती त्याची आठवण करून देत सोनोवाल यांनी प्रकल्पाच्या जलद अंमलबजावणीबद्दल कौतुक केले. मोठ्या 10 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाचा भाग म्हणून अवघ्या चार महिन्यांत पहिले 1 मेगावॅटचे मॉड्यूल सुरू होणे हे भारताच्या हरित हायड्रोजन परिसंस्थेतील अंमलबजावणीसाठी एक नवीन मानक असल्याचे दर्शवते.
“डीपीएने त्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणले आहे, जे मेरीटाईम इंडिया व्हिजन 2030 अंतर्गत गती, व्याप्ती आणि कौशल्याचे एक झळाळते उदाहरण आहे,” असे केंद्रीय मंत्री म्हणाले.
हा प्रकल्प दरवर्षी अंदाजे 140 मेट्रिक टन हरित हायड्रोजन उत्पादन करण्यास सक्षम असून सागरी डीकार्बोनायझेशन आणि शाश्वत बंदर परिचालनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यास सज्ज आहे.
सोनोवाल यांनी डीपीएच्या हरित उपक्रमांसाठीच्या निरंतर वचनबद्धतेचे कौतुक केले, त्यांनी भारताच्या पहिल्या मेक-इन-इंडिया ऑल-इलेक्ट्रिक ग्रीन टगच्या पूर्वीच्या तैनातीचा उल्लेख केला. सोनोवाल यांनी संपूर्णत: भारतीय अभियंत्यांनी बांधलेल्या आत्मनिर्भर, भविष्यासाठी सज्ज अशा हायड्रोजन परिसंस्था स्थापनेचे कौतुक केले आणि ही घटना देशभरातील बंदरांना पर्यावरणपूरक आणि नवोन्मेषी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
डीपीएच्या नेतृत्वाचे आणि एल अँड टीच्या अभियांत्रिकी उत्कृष्टतेचे अभिनंदन करताना सोनोवाल म्हणाले: “मी अध्यक्षांच्या नेतृत्वाखालील दीनदयाळ बंदर प्राधिकरणाच्या संपूर्ण चमूचे आणि हा जटिल प्रकल्प उल्लेखनीय वेगाने आणि अचूकतेने पूर्ण केल्याबद्दल एल अँड टीच्या अभियंत्यांचे कौतुक करतो.”
राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांनीही या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक केले. : “हा केवळ गुजरातसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. डीपीए येथे हा हरित हायड्रोजन कारखाना कार्यान्वित होण्याने स्वच्छ ऊर्जा, नवोन्मेष आणि आत्मनिर्भरतेमधील भारताच्या वाढत्या नेतृत्वाला अधोरेखित केले आहे. शाश्वत सागरी भविष्यासाठी हे धाडसी पाऊल उचलल्याबद्दल मी संपूर्ण चमूचे अभिनंदन करतो.”
भारत अधिक हरित सागरी भविष्याकडे वाटचाल करत असताना, राष्ट्रीय प्राधान्यक्रम आणि जागतिक शाश्वतता उद्दिष्टांच्या अनुषंगाने नवोन्मेष आणि परिवर्तन घडवून आणण्याचे उदाहरण देऊन दीनदयाळ बंदर प्राधिकरणाने या क्षेत्रातील नेतृत्व कायम ठेवले आहे.