विशेष प्रतिनिधी, मुंबई
बुद्धीच्या बळावर जगज्जेतेपदाची माळच गळ्यात घालून फिरणारा विश्वनाथन आनंद याला बुद्धीबळात कुणी पराभूत केले, यावर भारतात सोडा जगातच कुणी विश्वास ठेवणार नाही. अर्थात स्पर्धांमध्ये अनेकदा त्यांना पराभवही पत्करावा लागला आहे, मात्र तो अनुभवी खेळाडूंकडून. इथे मात्र एका उद्योजकाने आनंद यांना पराभूत केले आणि दुसऱ्या दिवशी ‘मी चुकलो‘ म्हणत माफी मागितली. त्याचे कारण जाणून घेऊया…
काही दिवसांपूर्वी सेलिब्रिटींसाठी एका बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतून येणारा पैसा समाजकार्यासाठी वापरला जाणार होता. या स्पर्धेत आमिर खान, यजुर्वेंद्र चहल, रितेश देशमुख यांच्यासह जगज्जेता बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंदही सहभागी झाला होता. काही उद्योजकही स्पर्धेत सहभागी होते. आनलाईन शेअर ट्रेडींग अॅप ‘जिरोधा‘चे सहसंस्थापक व देशातील सर्वांत युवा अरबपती निखील कामथ यांनी आनंदला पराभूत केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. कामथ यांची वर्षाची उलाढाल शंभर कोटींपेक्षा जास्त आहे. शिवाय युवा वर्गात ते लोकप्रिय आहेत. मात्र ‘संगणकाच्या आधाराने आपण आनंद यांना पराभूत केले असून हा मोठा धोका आहे. मी चुकलो मला क्षमा करा‘ या शब्दांत कामथ यांनी माफी मागितली आणि देशभरातून त्यांच्यावर टिका होऊ लागली. सोशल मिडीयावर त्यांना ट्रोल केले गेले. ही स्पर्धा चेस डॉट कॉमवर खेळली गेली होती. आता या संकेतस्थळावरून कामथ यांचे प्रोफाईल लॉक करण्यात आले आहे.
कामथ यांनी नेमके काय केले
निखील कामथ यांनी संगणक आणि बुद्धीबळातील चालींसाठी सर्च इंजिन वापरले आणि त्या आधारावर आनंद यांचा पराभव केला. ही बाब देखील कामथ यांनी स्वतःहून सांगितली नाही. तज्ज्ञांनी विश्लेषणातून त्याचा उलगडा केल्यानंतर बोंब झाली. त्यामुळे कामथ यांना ट्रोल केले गेले. त्यानंतरच त्यांनी माफी मागितली.
मी नेहमीप्रमाणे खेळलो – आनंद
आनंद यांनी कामथ यांचा माफीनामा ट्वीट करीत ‘मी नेहमीप्रमाणे नियमांत खेळलो आणि इतरांकडूनही तिच अपेक्षा केली होती‘ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.