नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांद्यामुळे थेट केंद्र सरकार गडगडले असे म्हटले जाते. कांदा हा अनेकदा रडू आणतो तर उत्पादकांसमोर सतत आव्हान निर्माण करीत असतो. योग्य दराअभावी उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने सतत कांद्याचा प्रश्न चर्चेत असतो. या सर्व प्रकाराची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. त्यामुळेच काढणी पश्चात कांद्याचे नुकसान कमी करण्यासाठी एक पुढाकार घेण्यात आला आहे.
काढणी पश्चात कांद्याचे नुकसान कमी करण्यासाठी आयोजित केलेल्या ”ग्रँड ओनियन चॅलेंज” संदर्भात ग्राहक व्यवहार विभागाने आज शैक्षणिक संस्थांचे प्रमुख, कुलगुरू, प्राध्यापक, प्रख्यात संस्थांचे अधिष्ठाता ,वरिष्ठ शिक्षणतज्ज्ञ, स्टार्टअपचे कार्यकारी , बीएआरसी मधील शास्त्रज्ञ, अणुऊर्जा विभाग, शिक्षण मंत्रालय, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे अधिकारी आणि कृषी, फलोत्पादन आणि अन्न प्रक्रिया.क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांसह दूरदृश्य प्रणालीद्वारे एका बैठकीचे आयोजन केले होते
या चॅलेन्जच्या माध्यमातून देशात कांद्याचे काढणी पूर्व तंत्र , प्राथमिक प्रक्रिया, साठवणूक आणि काढणीनंतर कांद्याची वाहतूक यात सुधारणा करण्यासाठी, उत्पादन रचना आणि मूळ नमुना याचा अभ्यास असलेल्या तरुण व्यावसायिक, प्राध्यापक, वैज्ञानिकांकडून कल्पना मागवण्यात येत आहेत. निर्जलीकरण, कांद्याचे मूल्यस्थापन आणि कांदा प्रक्रिया क्षेत्रात तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण करण्याच्या कल्पनाही या चॅलेंजच्या माध्यमातून मागवण्यात येत आहेत.
देशातील सर्वोत्कृष्ट बुद्धिमान लोकांकडून वर नमूद केलेल्या सर्व क्षेत्रामधील कल्पना प्राप्त करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागाद्वारे २० जुलै रोजी सुरु करण्यात आलेले ग्रँड ओनियन चॅलेंज १५ ऑक्टोंबर २०२२ पर्यंत खुले आहे. या चॅलेंजबाबत अधिक माहिती विभागाच्या doca.gov.in/goi या संकेतस्थळावर उपलब्ध आहे
ग्रँड ओनियन चॅलेंजच्या नोंदणी वेबपृष्ठावर आतापर्यंत १२२ नोंदणी प्राप्त झाल्या आहेत आणि काही सहभागींनी त्यांच्या कल्पना सादर केल्या आहेत. विभागाकडून चार श्रेणीमध्ये ४० चांगल्या कल्पना निवडल्या जातील या कल्पनांमधून सुधारणा आणि तंत्रज्ञान नवकल्पना शोधल्या जातील.म्हणूनच कांद्याचे काढणीपूर्व, प्राथमिक प्रक्रियेतील , साठवणूक आणि वाहतूक यातील नुकसान टाळण्यासाठी किफायतशीर उपाय विकसित करण्याच्या दृष्टीने आणि या प्रक्रियेच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत उपक्रमाला पाठबळ देण्याच्या अनुषंगाने देशातील संबंधित विभाग आणि संस्थांना कल्पना सादर करण्याचे आवाहन केले जात आहे.
विविध संस्था/विद्यापीठातील संशोधक आणि प्राध्यापकांनी कांद्याची साठवणूक आणि वाहतूक करताना होणारे नुकसान कमी करण्यासाठी अनेक अनोख्या कल्पना मांडल्या आहेत. देशभरातून विविध संस्था, विद्यापीठे, संशोधन संस्था आणि खाजगी क्षेत्रातील स्टार्टअप्समधील २८२ हून अधिक सहभागींनी या आभासी बैठकीत सहभाग घेतला.