प्रतिनिधी, नंदुरबार
अक्कलकुवा तालुक्यात नर्मदा काठावरील मणिबेली आणि बामणी या गावांना नवसंजीवनी योजनेअंतर्गत जून ते सप्टेंबर महिन्याचे धान्य बार्जद्वारे पोहोचविण्यात आले. हे धान्य लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहे.
नर्मदा काठावरील गावांना पावसाळ्यापूर्वी धान्य पोहोचविण्यात येते. त्यानुसार मणिबेली येथे 74.04 क्विंटल गहू आणि 61.58 क्विंटल तांदूळ तसेच बामणी येथे 154.16 क्विंटल गहू आणि 104.28 क्विंटल तांदूळ असे एकूण 394 क्विंटल धान्य पोहोचविण्यात आले. पथकात पुरवठा निरीक्षक एस.डी.चौधरी, मंडळ अधिकारी टी.पी.चंद्रात्रे, तलाठी पी.एस.पाडवी आणि पी.आर.कोकणी यांचा समावेश होता.
अक्कलकुवा ते केवडियापर्यंत धान्य ट्रकने पोहोचविण्यात आले. तेथून बार्जच्या सहाय्याने मणिबेली आणि बामणी येथे नेण्यात आले. चिमलखेडी, धनखेडी आणि डनेल या गावांनादेखील याच आठवड्यात धान्य पोहोचविण्यात येणार असल्याचे तहसिलदार रामजी राठोड यांनी सांगितले.