इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून रोजगारक्षम बनवण्यासाठी ९ जुलै २०२४ रोजी शासनाने “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY)” सुरु केली आहे.
मात्र, सदर योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणाचा कालावधी ५ वर्षे करण्यात आला असल्याचा बनावट शासन निर्णय समाजमाध्यमांवर प्रसारित होत असल्याचे १४ जुलै २०२५ रोजी शासनाच्या निदर्शनास आले आहे. शासनाने स्पष्टपणे कळवले आहे की, हा शासन निर्णय पूर्णतः खोटा असून, शासनाने अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. या खोट्या माहितीतून प्रशिक्षणार्थी व सर्वसामान्य जनतेची फसवणूक तसेच दिशाभूल करण्याचा प्रकार आहे.
प्रशासनाने सर्व संबंधित कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचित केले आहे की, कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. अशा खोट्या संदेशांमुळे संभ्रम टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी व सदर बाब आपल्या स्तरावरून संबंधितांच्या निदर्शनास आणून द्यावी. नागरिकांनी अधिकृत शासकीय संकेतस्थळांवरूनच माहिती घ्यावी व अपप्रचाराला बळी पडू नये, असे शासनाचे आवाहन आहे.