विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
भारतात एस्ट्राजेनेकाची कोविशिल्ड लस घेतल्यानंतर लोकांच्या रक्ताच्या गाठी होत असल्याची बाब समोर आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सांगितले. अशा लोकांची संख्या खूपच कमी म्हणजे नसल्यातच आहे.
भारतात आपत्कालीन परिस्थितीत वारण्यासाठी मंजुरी देण्यात आलेल्या तीन लशींपैकी कोविशिल्ड ही एक लस आहे. कोविशिल्ड लशीचा सर्वात व्यापक स्वरूपात वापर केला जात आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट (एसआयआय) ने ही लस बनविली आहे. एईएफआय समितीच्या एका अहवालाचा हवाला देत आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, कोविशिल्डचा डोस घेतलेल्या लोकांना थ्रोम्बोम्बोलिक (रक्ताच्या गाठी बनण्याचे मोठे रूप) होण्याची खूपच कमी पण होण्याची शक्यता आहे.
थ्रोम्बोम्बोलिक झाल्याच्या घटनांमध्ये रक्ताच्या धमण्यांमध्ये गाठी तुटून दुसर्या धमण्यांमध्ये जाण्याची शक्यता असते आणि त्या धमण्या ब्लॉक होण्याची शक्यता असते. प्रत्येक १० लाख लोकांमागे एकापेक्षा कमी व्यक्तीला याची तक्रार असते. थ्रोम्बोम्बोलिकच्या लक्षणांबाबत जनजागृती करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने एक यादी प्रसिद्ध केली आहे. लस घेतल्याच्या २० दिवसांच्या आत ही लक्षणे आढळल्यास जिथे लस घेतली तेथील आरोग्य व्यवस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
लक्षणांची यादी
– श्वास लागणे
– छातीत वेदना
– उलटी झाल्याविना किंवा उलटीसोबतच झटके येणे
– उलटीसोबतच किंवा उलटीविना गंभीर आणि सलग डोकेदुखी
– शरीरातील विशेष भागात कमजोरी
– कोणतेही स्पष्ट कारण नसताना उलटी होणे
– अस्पष्ट दिसणे किंवा डोळे दुखणे, दोन छाया दिसणे
– मानसिक स्थिती बदलणे, भ्रम किंवा नैराश्य येणे
– इतर कोणतेही लक्षणे जे रुग्ण किंवा कुटुंबीयांसाठी चिंतेचा विषय आहे
अहवाल काय सांगतो
एईएफआय समितीनुसार, त्यांनी अशा ४९८ गंभीर रुग्णांचा आढावा घेतला. त्यामध्ये २६ रुग्ण संभाव्य थ्रोम्बोम्बोलिकचे रुग्ण आढळले. प्रत्येक १० लाख रुग्णांपैकी ०.६१ रुग्णांचा अहवाल थ्रोम्बोम्बोलिक झाल्याचे आढळले आहेत.