नवी दिल्ली (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – कृषी कायदे मागे घेण्यावरून केंद्र सरकारवर कायम निशाणा साधणारे मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी एक पाऊल पुढे जाऊन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. त्यांनी एका कार्यक्रमात पंतप्रधानांविरुद्ध वक्तव्य करून भाजप नेतृत्वाचा आणखी रोष ओढवून घेतला आहे.
राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सरकार आणि भाजप नेतृत्वाबद्दलची आपली आक्रमक वृत्ती कायम ठेवली आहे. शेतकरी आंदोलनावर चर्चा करण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली तेव्हा त्यांच्यामध्ये अहंकार दिसून आला. तसेच पंतप्रधानांसोबत वादही झाल्याचा दावा करत मलिक यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
हरियाणामधील दादरीमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, की शेतकरी आंदोलनासंदर्भात जेव्हा मी पंतप्रधानांना भेटलो तेव्हा पाच मिनिटांतच माझे त्यांच्याशी भांडण झाले. त्यांच्यात अहंकार दिसत होता. जेव्हा मी त्यांना सांगितले, की ५०० नागरिकांचा मृत्यू झाला. तेव्हा ते म्हणाले, की माझ्यासाठी मेले आहेत का? मी म्हणालो, तुमच्यासाठीच मेले आहेत. कारण तुम्ही राजा झाला आहात. त्यावरून माझे त्यांच्याशी भांडण झाले. तेव्हा ते म्हणाले, आता तुम्ही अमित शाह यांना भेटा. त्यानंतर मी अमित शाह यांना भेटलो.
दादरी येथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मलिक म्हणाले, की कृषी कायदे मागे घेण्याबाबत सरकारच्या निर्णयावर सल्ला मागण्यात आला. तेव्हा ते म्हणाले, पंतप्रधानांनी जे सांगितले त्याशिवाय आणखी काय सांगितले जाऊ शकत होते. शेतकर्यांनी निर्णय घेतला पाहिजे. आम्हाला असे काही करण्याऐवजी एमएसपीसाठी कायदेशीर हमी मिळविण्यासाठी त्यांची मदत घेतली पाहिजे. ते म्हणाले, की शेतकर्यांविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे अद्याप मागे घेतले गेले नाहीत. सरकारने गुन्हे मागे घेण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे एमएसपीवर कायदा बनविण्याचीही आवश्यकता आहे.