मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय संस्कृती पुरातन – नित्यनूतन असून युरोपमधील पुनर्जागरणाप्रमाणे (Renaissance) आज भारतीय पुनर्जागरण होत आहे. अशा वेळी भारतीय संस्कृती व सभ्यतेचा प्रचार प्रसार कसा होईल या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत, असे सांगताना काशी व अयोध्येच्या पुनरुत्थानाप्रमाणेच राज्यात देखील पंचवटी – त्र्यंबकेश्वर कॉरिडॉर विकसित व्हावा, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
केंद्रीय शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्या सूचनेनुसार केंद्रीय संस्कृत विद्यापीठ नवी दिल्ली तर्फे आयोजित ‘भारतीय बौद्धिक संपदा व सांस्कृतिक वारशाचे नवे आयाम’ या विषयावरील ‘विकास यात्रा’ या एक दिवसीय चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या उपस्थितीत गिरगाव चौपाटी मुंबई येथील भारतीय विद्या भवनच्या सभागृहात पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.
भारतीय विद्या भवनच्या मुंबादेवी आदर्श संस्कृत महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित या चर्चासत्राच्या उद्घाटनाला केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ श्रीनिवास वरखेडी, श्री करपात्री धाम वाराणसीचे पीठाधीश स्वामी अभिषेक ब्रह्मचारी, युवा चेतनाचे राष्ट्रीय संयोजक रोहित कुमार सिंह, भवनच्या संस्कृत अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. गिरीश जानी, विद्यार्थी व प्रतिनिधी उपस्थित होते.
पारतंत्र्यात अनेक वर्षे गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आदी अनेक थोर महापुरुषांच्या प्रयत्नामुळे भारत आज पुन्हा एकदा जगात स्वाभिमानाने उभा आहे. जगातील लोकांना भारत जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मातृभाषा, संस्कृती व संस्कार जपले पाहिजेत, असे राज्यपालांनी सांगितले.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी चर्चासत्राच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. सुरुवातीला भवनच्या संगीत नर्तन शिक्षा पीठ येथील विद्यार्थ्यांना मंगलाचरण व कुलगीत सादर केले.
Governor Koshyari on Panchavati Trimbakeshwar Corridor
Nashik Religious Culture