मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एखाद्या राज्याचे राज्यपालपद किती मोठे आणि मानाचे असते हे कुणाला सांगण्याची गरज नाही. त्यातल्या त्यात गेली कित्येक वर्ष आपण बघत आलोय की, राज्यपाल सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फार कमी जात असतात. आणि अत्यंत मोजकं आणि नेमकं भाषण करत असतात. पण महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी याला अपवाद आहेत. ते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तर सहभागी होतातच, शिवाय त्यांची भाषणंही वादग्रस्त ठरतात.
राज्यपाल कोश्यारी सध्या महापुरुषांचा अपमान करण्यावरून वादात आहेत. काही दिवसांपूर्वी यांनी जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्याविरुद्ध रोष उसळला होता. एक प्रकरण शांत होत नाही तर दुसरं प्रकरण उभं करण्यासाठी ते तयारच असतात. आता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून वाद ओढवून घेतला आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व इतर काही महापुरुषांचे एकेरी उल्लेख केले. ते म्हणाले, ‘आज सब कहते है शिवाजी होने चाहीए, चंद्रशेखर होने चाहीए, भगतसिंह होने चाहीए, नेताजी होने चाहीए, लेकिन मेरे घर में नहीं… दुसरों के घर में होने चाहीए.’ राज्यपाल कोश्यारी यांच्या भाषणातील एवढ्याच विधानाचा व्हिडियो व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे विरोधकांना आणखी एक कोलित हाती लागलेले आहे.
राज्यपाल महोदयांकडून मुंबई येथे राजभवनातील कार्यक्रमात परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचा एकेरी उल्लेख !
नेमके राज्यपालांच्या मनात चाललंय तरी काय ? आता तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा करतील का? pic.twitter.com/B7anekQ2q0— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 7, 2023
मिटकरी काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपालांच्या भाषणातील या विधानाचा व्हिडियो ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यपालांच्या मनात काय चाललं आहे, हे फडणवीस आणि शिंदे सांगतील का, असा सवाल त्यांनी केला आहे.
हॉट टॉपिक
महाराष्ट्रात सध्या सत्ताधाऱ्यांकडून महापुरुषांचे होणारे अपमान हॉट टॉपिक ठरत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे तर सत्ताधाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून टार्गेटवर आहेतच. शिवाय भाजपा आणि शिंदे गटातील नेतेही अपमान करण्याच्या मालीकेत कुठेच कमी नाहीत.
Governor Koshyari on Chhatrapati Shivaji Maharaj Statement