औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या राज्यात काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सर्वत्र वादळ उठलेले असतानाच दुसरीकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील एका वेगळ्या विषयावर वादग्रस्त वक्तव्य केल्याने नवा वाद उत्पन्न झाला आहे. अर्थात राज्यपाल कोश्यारी हे नेहमीच आपल्या भाषणात काहीतरी बेताल वक्तव्य करून वाद निर्माण करतात. आता देखील असाच प्रकार झाल्याने त्यांना महाराष्ट्राबाहेर पाठविण्याची मागणी जोर धरत आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी तुलना केली आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांच्या या विधानावर सर्वच स्तरातून निषेधाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावरूनच आता माजी खासदार संभाजी छत्रपती संभाजीराजे यांनीही राज्यपालांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांना महाराष्ट्रातून बाहेर काढा, अशी आग्रही मागणी संभाजी छत्रपती यांच्यासह शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांनी केली आहे.
खरे म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नेहमीच काहीतरी वादाची वक्तव्य तथा विधाने करतात आणि त्यावरून वाद निर्माण होतो. त्यानंतर त्यांच्यावर माफी मागण्याची पाळी येते. आता त्यांनी आज पुन्हा एक वादग्रस्त विधान केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. तर नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत, असे विधान करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादाला तोंड फोडले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बोलत होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आले. यावेळी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली.
राज्यपालांच्या अशा वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. त्यावरच बोलताना माजी खासदार छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, राज्यपाल असे का बडतात मला माहीत नाही. त्यांना महाराष्ट्रातून पाठवून द्या, अस मी परवा सुद्धा म्हटले होते . मी पंतप्रधानांना पुन्हा हात जोडून विनंती करतो, प्लीज प्लीज अशी व्यक्ती महाराष्ट्रात नको आम्हाला. कारण शिवाजी महाराज असतील इतर महापुरुष असतील संत असतील यांच्याबाबत घाणेरडा विचार घेऊन राज्यपाल येऊच कसे शकतात? राज्यपालांना महाराष्ट्रातून बाहेर काढा, अशी संतप्त प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे.
नेमके काय म्हणाले कोश्यारी
आता राज्यपाल नेमके काय म्हणाले जाणून घेऊ या, आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मला आता असे वाटते, तुम्हाला कोणी विचारले तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील.डॉ. आंबेडकरां पासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असेही वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.
https://twitter.com/NCPspeaks/status/1593940126735822849?s=20&t=NBsvCEgnzEDocnfNNUo0Zw
राज्यपाल हे महाराष्ट्रद्रोही आणि शिवद्रोही देखील आहेत. राज्यपाल महोदय छत्रपती शिवाजी महाराज साडेतीनशे वर्षानंतर देखील महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रत्येक माणसाच्या नसानसात भिनलेले आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर आहे. तुम्ही एकदा गडकिल्ले फिरा म्हणजे तुम्हाला कळेल, असं संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे.
लेखक आणि इतिहास तज्ज्ञ श्रीमंत कोकाटे यांनीही राज्यपालांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. राज्यपाल हे नेहमी संदर्भहिन बोलतात, वादग्रस्त बोलतात आणि अपमानजनक बोलतात. राज्यपाल पदाची प्रतिष्ठा गमावलेली व्यक्ती म्हणजे कोश्यारी. शरद पवार आणि नितीन गडकरी कर्तृत्ववान आहेतच. त्याच्याबद्दल आदर आहेच. पण राजपालांनी महाराजांचा उपमर्द केला, असे श्रीमंत कोकाटे यांनी म्हटले आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनीही राज्यपालांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे.
Governor Bhagat singh Koshyari Controversial Statement Again