मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि वाद या जणू काही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, कारण गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य करून ते खळबळ उडून देतात, सध्या देखील असाच प्रकार सुरू आहे. आता तर त्यांनी आपल्या कृतीने आणखीनच कहर केला, असे दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील आक्षेपार्ह विधानामुळे आधीच वादात असलेले राज्यपाल कोश्यारी आणखी एका वादात सापडले आहेत.
मुंबईवर दि. २६ नोव्हेंबर २००८ रोजी भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, पोलीस अधिकारी अशोक कामटे आणि विजय साळसकर, तुकाराम ओंबळे यांसह इतरही जवान शहीद झाले होते. तसेच अनेक निष्पाप नागरीक ठार झाले होते. मुंबईतील गिरगाव चौपाटी येथील पोलीस स्मारकच्या ठिकाणी शहीदांना आज आदरांजली वाहण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीदांना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांनी शहीदांना आदरांजली वाहण्यापूर्वी पायातील पादत्राणे काढली. पण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पायातील चप्पल काढली नाही. चप्पल घालूनच राज्यपाल कोश्यारी यांनी शहीदांना आदरांजली वाहिली. यामुळे राज्यपालांच्या या कृतीवर आता टीका होत आहे.
भगतसिंह कोश्यारी यांनी शहिदांना चप्पल घालूनच श्रद्धांजली वाहिल्याने राज्यपाल कोश्यारी अडचणीत सापडले आहेत. कारण काँग्रेसने राज्यपाल कोश्यारी यांचा हा श्रद्धांजली वाहतानाचा व्हिडिओ ट्विट केला असून राज्यपालांच्या या कृतीवर तीव्र शब्दात संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे आधीच वादात सापडलेल्या भगतसिंह कोश्यारी यांनी आता शहीदांचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली. त्यासोबतच शिवरायांच्या वंशाजांनीही कोश्यांना हटवण्याची मागणी केली.
आता या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी हे दिल्लीला गेले होते. कोश्यारी दिल्लीला गेल्याने त्यांची राज्यपाल पदावरून गच्छंती अटळ आहे, अशी चर्चाही सुरू झाली होती. पण भगतसिंह कोश्यारी पुन्हा महाराष्ट्रात आले. त्यानंतर आता राज्यपाल कोश्यारींच्या आजच्या एका कृतीने नव्या वादाला पुन्हा तोंड फुटले आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ही टीका केली आहे. अभिवादन करताना पादत्राणे बाजूला काढून ठेवणे ही भारताची संस्कृती असून महाराष्ट्राची तर आहेच आहे. सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती व महापुरुषांचा अनादर करणारे राज्यपाल हुतात्म्यांचाही अनादर करत असताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून दिली असती तर बरे झाले असते, असेही ट्विट करत सावंत यांनी टीका केली आहे.
अभिवादन करताना पादत्राणे बाजूला काढून ठेवणे ही भारताची संस्कृती आहे. महाराष्ट्राची तर आहेच आहे. सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती व महापुरुषांचा अनादर करणारे राज्यपाल हुतात्म्यांचाही अनादर करत असताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून दिली असती तर बरे झाले असते pic.twitter.com/7Ujwgtuv4x
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) November 26, 2022
Governor Bhagat Singh Koshyari Video Viral
Controversy