मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या राजकीय भूकंप तथा सतांत्तर नाट्याला आता अधिकच रंगत आली आहे. तसेच राजकीय घडामोडी तीन दिवसानंतरही सुरूच आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन संवाद साधल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे आता पुढचे पाऊल काय असेल याची उत्सुकता ताणली गेली आहे. मात्र, या सत्तापेचात आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिखाळ यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
आपल्याकडे 40 पेक्षा जास्त आमदारांचे समर्थन असल्याचे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच महाविकास आघाडीतील घटक असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्तेत सहभाग नकोच, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यांच्या पुढे आता भारतीय जनता पार्टी सोबत जाण्याशिवाय पर्याय उरलेला दिसत नाही. अशा या राजकीय पेचप्रसंग राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याने ते रुग्णालयात दाखल झाले असले तरी तिथूनच ते सर्व प्रशासकीय कारभार चालवणार आहेत, असे सांगितले जाते. महाविकास आघाडी धोक्यात आली तर भाजपकडून राज्यपलांना विनंती केली जाईल आणि विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलवले जाईल. त्यानंतर मतांचे गणित जुळले नाही तर महाविकास आघाडी सरकार कोसळेल. परिणामी, भाजप आणि शिंदे गट यांचे संख्याबळ अधिक असल्याने त्यांना सत्तास्थापनेसाठी राज्यपाल आमंत्रण देतील. परिणामी भाजप आणि शिवसेनेचे बंडखोर यांच्यातील युतीद्वारे पुन्हा एकदा भाजपची पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्य स्थापन होऊ शकते.
मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यास कदाचित उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्या वाटेला येऊ शकते. परंतु सत्ता स्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ नसल्यास कदाचित राष्ट्रपती राजवट देखील लागण्याची शक्यता आहे. कारण सत्ता स्थापन केल्यानंतर विधानसभेत संबंधित सत्ताधारी गटाला बहुमत सिद्ध करावे लागेल. याच दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष यांनी आमदारांना बंडखोरी ठरवल्यास त्यांना त्यांना विश्वास दर्शक ठरावात मतदान करता येणार नाही.
कदाचित पुन्हा निलंबित आमदार उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयात आव्हान देऊ शकतात, म्हणजेच पुन्हा राज्यात सरकारच्या सत्तास्थापनेत टांगती तलवार निर्माण होऊ शकते, त्यामुळे विधानसभा अध्यक्षांचे एक प्रकारे मोठी जबाबदारी असून किंबहुना परीक्षा असणार आहे. सध्या विधानसभेला कायमस्वरूपी अध्यक्ष नसून उपाध्यक्ष असलेले नरहरी झिरवाळ यांच्याकडे प्रभारी अध्यक्ष पदाचा कार्यभार आहे, त्यामुळे ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. झिरवाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. ते कट्टर शरद पवार समर्थक आहेत. त्यामुळे कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी ते शरद पवार यांचा सल्ला घेणार आहेत. म्हणजेच, या सर्व प्रक्रियेत शरद पवार यांची भूमिकाही मोलाची ठरणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटात दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदीनुसार दोन तृतीयांश आमदार मूळ पक्षातून बाहेर पडल्यास अपात्रतेची कारवाई होत नाही. यामुळेच शिवसेनेतील ३७ किंवा त्यापेक्षा अधिक आमदार बाहेर पडावेत या दृष्टीने नियोजन सुरू आहे. दिवसभरात मंत्री गुलाबराव पाटील, योगेश कदम हे शिवसेनेचे दोन आमदार तसेच मंजूळा गावित आणि चंद्रकांत पाटील हे दोन अपक्ष शिंदे यांच्याबरोबर गुवाहाटीत असलेल्या आमदारांच्या गोटात दाखल झाले. ३७ आमदारांची संख्या झाल्यावरच पुढील हालचाली केल्या जातील. सध्या शिवसेनेतील आणखी आमदार शिंदे गटात सहभागी व्हावेत या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडली हे कायदेशीरदृष्टय़ा सिद्ध करण्याकरिता ३७ आमदारांची आवश्यकता आहे. ३७ आमदारांच्या स्वाक्षऱ्या प्राप्त झाल्यावर शिंदे यांच्याकडून राज्यपालांकडे पत्र दिले जाईल. या पत्रात स्वतंत्र गट स्थापन करण्यात आल्याचा दावा केला जाईल. पुढील दोन दिवसांत ही प्रक्रिया केली जाईल, असे सांगण्यात येत आहे.
Governor Bhagat Singh Koshyari Deputy Speaker of the Legislative Assembly Narhari Zirwal Maharashtra political crisis