मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात संतापाचा उद्रेक होत आहे. शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य संघटनांनी रस्त्यावर उतरून कोश्यारींचा जोरदार निषेध केला. याबाबत अद्याप एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवरील दबाव वाढला आहे. याबाबत केंद्र सरकारकडे देखील तक्रार करण्यात आली असून अद्यापही राज्यपालांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. मात्र लवकरच राज्यपाल हे दिल्ली दौऱ्यावर जात असल्याने त्यादरम्यान तरी भाजपचे वरिष्ठ नेते राज्यपालांना या संदर्भात जाब विचारतील किंवा खडसावतील काय? की राज्यपालांची बदली केली जाईल, यासंदर्भात उलट सुलट चर्चा सुरू आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य करुन राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विनाकारण वाद ओढवून घेतला. त्यांच्या विधानामुळे राज्यभरातील शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार व छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा कडक शब्दात समाचार घेतला आहे.
विशेष म्हणजे राज्यातील भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: कोश्यारी यांच्या विधानाशी आपण सहमत नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, जोपर्यंत सूर्य, चंद्र आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्शच राहतील, असेही विधान फडणवीसांनी केले आहे.
राज्यपालांच्या वादग्रस्त विधानामुळे शिंदे गटानेदेखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे राज्यपालांना पदावरुन दूर करा, अशी मागणी आता विरोधकांकडून जोर धरु लागली आहे. त्यांच्या वादग्रस्त विधानावरुन राज्याच्या राजकारणात गदारोळ माजलेला असताना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भगतसिंह कोश्यारी दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.
राज्यपाल कोश्यारी दि. २४ आणि २५ नोव्हेंबरला दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. तसेच राज्यपाल कोश्यारी यांचे उत्तर भारतात नियोजित कार्यक्रम आहेत. राज्यपालांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. कारण राज्यपालांनी चार दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बोलत होते.
यावेळी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी केली. महत्वाचे म्हणजे यापुर्वी देखील राज्यपालांनी अनेक वेळा अनेक महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे त्यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल दिल्लीलीत भाजपचे वरिष्ठ नेते त्यांची कानउघाडणी करतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Governor Bhagat Singh Koshyari Delhi Tour
Politics Controversy