मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्यानंतर आता अखेर माफी मागितली आहे. माझी चुक झाली असे त्यांनी म्हटले आहे. कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात वक्तव्य केले होते की, महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती किंवा राजस्थानी लोकांना काढू टाकले, तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही. मुंबईही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण ती आर्थिक राजधानी म्हणून ओळखलीच जाणार नाही.” त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले. अखेर त्याची दखल घेत कोश्यारी यांनी माफी मागितली आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिनांक २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे.
गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. परंतु त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतूकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही. महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो.
https://twitter.com/maha_governor/status/1554101167906779136?s=20&t=kcoFsV4Z9zpHn5hC3hWgKA
Governor Bhagat Singh Koshyari apologies