मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांमध्ये कोणाची वर्णी लागणार? याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. राज्यपाल नियुक्त या आमदारांची गेल्या दीड वर्षापासून खुपच चर्चा होत आहे. गेल्या सत्तेतील महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या नावांना राज्यपालांनी केराची टोपली दाखविली. ते सरकार पायऊतार झाले पण आमदारांची नियुक्ती काही झाली नाही. आता शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात पुन्हा एकदा राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावांनी जोर धरला आहे. त्यातील काही नावे पुढे आली आहेत.
गेल्या तीन महिन्यांतील नाट्यमय घडामोडींमुळे राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. त्यानंतर सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसाठी महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली यादी रद्द करून ती नव्याने पाठवण्याची घोषणा केली होती.
महाराष्ट्र विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी आणि मगच सभापती पदाची लढाई असे राजकीय नियोजन शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट आणि भाजप करत आहे. तसेच विधान परिषदेत भाजपचे बळ वाढून भाजपचा नेता सभापतीपदी विराजमान होऊ शकतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळते सभापती रामराजे निंबाळकर हे विधान परिषदेच्या सदस्य पदी निवडून आले असले तरी त्यांची पुन्हा एकदा सभापती पदावर नियुक्ती होण्याची निवड होण्याची शक्यता कमी आहे. आधीच त्यांचे जावई राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड केल्यानंतर भाजप रामराजे निंबाळकर यांच्या विधानपरिषद सभापती पदासाठी राजकीय दृष्ट्या अनुकूल असणे अपेक्षितही नाही.विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसांत राजभवनाकडून ही यादी प्रसिद्ध होणार असल्याचे समजते.
महाविकास आघाडी सरकारने सादर केलेल्या १२ आमदारांच्या यादीवर राज्यपालांनी दीड वर्ष निर्णय न घेतल्याने गेल्या सरकारच्या काळात हा मुद्दा प्रचंड गाजला होता. मात्र, नवे सरकार सत्तेवर येताच राजभवनाचा कारभार पुन्हा गतिमान झाला आहे. त्यामुळे दीड वर्षांपासूनचा हा तिढा सुटणार असल्याची अटकळ बांधली जात आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची ‘सागर’ बंगल्यावर बैठक झाली. त्यात १२ नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, यादी केंद्राकडे पाठविण्यात आली आहे. तेथे अंतिम मोहोर उठल्यानंतर राज्यपाल तत्काळ नावे जाहीर करतील. चालू अधिवेशन काळातच राज्यपाल नियुक्त सदस्यांचा तिढा सोडविण्याकडे भाजपचा कल आहे. सध्याच्या कलानुसार भाजपच्या पसंतीची ८, तर शिंदे गटाच्या पसंतीची ४ नावे, असा फॉर्म्युला ठरल्याचे कळते. राज्यपाल नियुक्त सदस्यत्वासाठी देण्यात येणारी नावे सर्वसमावेशक असावीत, याकडेही सत्ताधाऱ्यांचा कल आहे. तसेच राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून विधान परिषदेवर वर्णी लागावी, यासाठी भाजपमधील अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत. किंबहुना, यासाठी 1200 अर्ज आल्याची माहिती खुद्द फडणवीस यांनी एका बैठकीत दिली होती. त्यामुळे सर्वांनीच आमदारकी साठी आग्रह धरू नये, संयम ठेवावा, असा सबुरीचा सल्लाही त्यांनी दिला होता.
राज्यपाल नियुक्त आमदारांच्या १२ जागांसाठी भाजपा आणि शिंदे गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या १२ जागांपैकी ८ जागा भाजपाला तर ४ जागा शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यामध्ये भाजपाच्या वाट्याला ८ जागा येण्याची शक्यता आहे. या आठ जागांसाठी भाजपाकडून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पंकजा मुंडे, चित्रा वाघ, कृपाशंकर सिंह, गणेश हाके, सुधाकर भालेराव यांच्या नावांची चर्चा आहे.
शिंदे गटाच्या वाट्याला १२ जागांपैकी ४ जागा येण्याची शक्यता आहे. या चार जागांसाठी शिंदेगटातील माजी मंत्री रामदास कदम, विजय शिवतारे, अर्जुन खोतकर, नरेश म्हस्के, चंद्रकांत रघुवंशी, आनंदराव अडसूळ, अभिजित अडसूळ यांची नावं आघाडीवर आहेत. आधीच्या महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली १२ आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अखेरपर्यंत मंजूर केली नव्हती. त्यातच राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या १२ जागांसाठी नव्याने यादी पाठवण्याचे ठरविले होते.
Governor Appointed MLC 12 Names Shinde Group BJP
Politics Eknath Shinde Rebel Shivsena Leaders