नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरासह जिल्ह्यात लहान बालकांकडून मोलमजुरीची कामे केली जात असल्याची बाब नवीन नाही. मात्र, यासंदर्भात सरकारी यंत्रणेकडून कार्यवाही होताना दिसत नाही. इगतपुरी तालुक्यात बालकामगारांचा प्रश्न समोर आल्यानंतर आता चांदवड तालुक्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्याच्या कामगार विभागाच्या ऑनलाईन पोर्टलवर एक तक्रार प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने कामगार उपायुक्त विकास माळी आणि सहायक कामगार आयुक्त शर्वरी पोटे व सुजित शिर्के यांच्या निर्देशानुसार एक विशेष पथक तयार करण्यात आले. सरकारी कामगार अधिकारी नवनाथ वझरे, दुकाने निरीक्षक विशाल जोगी आणि निशा आढाव यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश होता. या पथकाने संयुक्त धाडसत्र राबविले. त्यानुसार, जिल्ह्यातील चांदवड परिसरात कांद्याच्या खळ्यावर बालकामगार संदर्भात धाड टाकण्यात आली. तेथे बालकामगारांची तपासणी करण्यात आली. सदर धाडीत एका खळ्यामधून १२ वर्षाच्या बालकांची मुक्तता करण्यात आली. तसेच, याप्रकरणी संबंधित आस्थापना मालकांविरुद्ध चांदवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
दरम्यान, जेथे बालकामगार कार्यरत असतील त्यासंदर्भात तातडीने कामगार विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Government Squad Child Labour FIR Booked