नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबविण्यात असून या योजनेच्या माध्यमातून नवीन व कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना विस्तारीकरण व अद्ययावतीकरणासाठी अर्थ सहाय्य केले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी 15 जून 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
शासकीय प्रसिध्दी पत्रकात नमुद केल्यानुसार, या योजनेंतर्गत “एक जिल्हा एक उत्पादन” या घटकांमध्ये कांदा या पिकाची निवड करण्यात आली आहे. तसेच या योजनेमध्ये 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षाच्या कालावधीकरीता असंघटीत क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांचा समावेश असून कार्यरत वैयक्तिक सूक्ष्म उद्योगांच्या स्पर्धा क्षमतेत वाढ करणे, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता गट व उत्पादक सहकारी संस्थाच्या उत्पादनासाठी सर्वंकष मुल्यसाखळी विकसित करण्यावर भर देण्यात0 येणार आहे. पात्र लाभार्थांसाठी या योजनेचा अर्ज कृषि विभागाच्या http://pmfme.mofpi.gov.in किंवा http://pmfme.mofpi.gov.in /mis/#/login या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी दिली आहे.
या योजनेसाठी वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडीत पात्र प्रकल्प किंमतीच्या 35 टक्के पर्यंत व जास्तीत जास्त 10 लाख रूपये मर्यादेत प्रती प्रकल्पासाठी अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये लाभार्थी हिस्सा 10 टक्के असणार असून यासाठी पात्र उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच सामायिक पायाभूत सुविधांसाठी यापूर्वी निर्धारित केलेली आर्थिक व्यवहाराची अट व अनुभव या योजनेसाठी शिथिल करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे मार्गदर्शक सूचनेत नमुद करण्यात आलेल्या Annexure -1 मधील प्रक्रिया प्रकल्प यासाठी पात्र राहणार नाही याची लाभार्थांनी नोंद घ्यावी, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. सोनवणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये सांगितले आहे.
वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, इन्क्युबेशन सेंटर, पायाभुत सुविधा, ब्रॅडिंग व विपणन, क्षमता बांधणी व संशोधन प्रशिक्षण संस्थेबाबत प्रशिक्षण या बाबींचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना, अटी व शर्तींची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक यांच्या कार्यालयात तसेच www.krushi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. सोनवणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.