राज्यात प्रथमच लाभार्थी ट्रॅकिंग व घरपोहोच मंजुरी आदेश सेवा…
या सरकारी योजनेला नवे डिजिटल रूप…
नावीन्यपूर्ण उपक्रमाची राज्यभर चर्चा…
अहिल्यानगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कर्जत तहसील कार्यालयाने विकसित केलेल्या ‘निराधार मित्र’ या मोबाईल ॲपच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना अर्जस्थिती तपासण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. तसेच लाभार्थ्यांना मंजूर आदेश थेट घरपोहोच मिळणार आहेत. त्यामुळे ही सेवा “राज्यातील प्रथम लाभार्थी ट्रॅकिंग व घरपोहोच आदेश सेवा” म्हणून राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.
संजय गांधी निराधार सामाजिक अर्थसाहाय्य योजना ही निराधार व गरजू नागरिकांसाठी जीवनदायी ठरलेली योजना असली तरी अर्ज प्रक्रिया व मंजुरी संदर्भात पूर्वी अनेक अडचणी येत होत्या. अर्ज भरल्यानंतर त्याची स्थिती तपासण्याची सुविधा नसल्याने लाभार्थ्यांना वारंवार कार्यालयात जावे लागत असे. मंजुरी आदेश वेळेवर न मिळाल्याने आर्थिक अडचणी वाढत होत्या.
ही अडचण लक्षात घेऊन तहसीलदार गुरु बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जतचे नायब तहसीलदार डॉ. मोहसिन शेख यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून ‘निराधार मित्र’ हे मोबाईल ॲप विकसित केले आहे.
सेवेची वैशिष्ट्ये
✔ आधार क्रमांकाच्या शेवटच्या ५ अंकांद्वारे अर्जस्थिती तपासता येते.
✔ अर्ज क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक वापरूनही तपासणी शक्य.
✔ अर्ज मंजूर झाल्यास आदेश प्रत मोबाईलवर पाहता व डाउनलोड करता येते.
✔ अर्ज नामंजूर झाल्यास कारण व त्रुटी स्पष्ट दिसतात.
✔ वर्ष व महिन्यानुसार संपूर्ण गावाची मंजूर यादी पाहता येते.
✔ गावातील स्वयंसेवक “निराधार मित्र” लाभार्थ्यांना अर्ज तपासून देतात.
ही सेवा ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी वेळ व पैसा वाचवणारी तसेच पारदर्शक प्रशासनाची नवी पायरी ठरणार आहे.
स्वयंसेवकांची भूमिका
ग्राम महसूल अधिकारी, पंचायत अधिकारी, महसूल सेवक व इच्छूक स्वयंसेवक तरुणांना ॲपबाबत प्रशिक्षण देऊन संबंधित गावासाठी “निराधार मित्र” म्हणून नेमण्यात येणार आहे. हे स्वयंसेवक अर्ज तपासणे, आदेश मिळवून देणे व त्रुटी समजावून सांगणे अशी सेवा लाभार्थ्यांपर्यंत विनामूल्य पोहोचवतील.
जे अर्जदार वृद्ध व निराधार आहेत, त्यांना चौकशी व मंजुरी आदेश मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयात वारंवार जावे लागणार नाही. तसेच पूर्वीप्रमाणे ग्राम महसूल अधिकारी पात्र लाभार्थ्यांचे मंजुरी आदेश घरपोहोच करतील. या पद्धतीत सुधारणा करून मंजुरी आदेश लवकर मिळावेत, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
तहसीलदार गुरु बिराजदार म्हणाले, “या ॲपची निर्मिती करणारे नायब तहसीलदार डॉ. मोहसिन शेख व त्यांच्या शाखेतील सर्व अधिकारी – कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत. ही सेवा कर्जत तालुक्यातील अधिकाधिक गावांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून, लाभार्थ्यांच्या अभिप्रायानुसार ॲपमध्ये आवश्यक सुधारणा सातत्याने केली जाणार आहेत.”
डॉ. मोहसिन शेख म्हणाले, “ही सेवा केवळ कर्जतपुरती मर्यादित न राहता राज्यासाठी आदर्श ठरेल. डिजिटल सेवा प्रत्येक गावात पोहोचवून लाभार्थ्यांचा वेळ आणि श्रम वाचवणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
ही योजना साकारताना तहसीलदार गुरु बिराजदार यांचे मार्गदर्शन लाभले. सहायक महसूल अधिकारी शिवाजी बरबडे, पल्लवी नांगरे, महसूल सहायक रावसाहेब लांडगे, संगणक सहायक विनायक सुरवसे आणि मंडळ अधिकारी कुळधरण धुळाजी केसकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
लाभार्थ्यांचा प्रतिसाद – समाधान आणि दिलासा
चाचणी टप्प्यातील लाभार्थ्यांनी सांगितले –
✔ “आता अर्ज तपासणे आणि आदेश मिळवणे सोपे झाले आहे.”
✔ “कार्यालयात जाण्याची गरज कमी झाली.”
✔ “त्रुटी समजल्याने अर्ज सुधारता येतो.”
ही सेवा लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा ठरली असून, प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
या योजनेच्या यशामुळे राज्यभर सामाजिक अर्थसाहाय्य योजनांमध्ये डिजिटल प्रशासनाचा नवा मानदंड निर्माण होईल.








