नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना विविध कर्ज योजनेंतर्गत स्वयंरोजगारासाठी अल्प व्याजदराने कर्ज वितरीत करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांनी कर्ज रकमेचा एक रकमी भरणा केल्यास व्याज रकमेत 50 टक्के सवलत देण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक संजय तायडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, ओबीसी महामंडळामार्फत इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना विहित मुदतीत कर्ज भरण्यासाठी सवलत देण्यात आली होती. दिलेल्या सवलतीत ज्या लाभार्थ्यांनी कर्ज रकमेची परतफेड केली नाही, अशा लाभार्थ्यांसाठी एक रकमी परतावा (OTS) योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्याने थकीत मुद्दल व व्याजाचा एक रकमी भरणा केल्यास त्याला थकीत व्याज रकमेत 50 टक्के सुट देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा व्यवस्थापक संजय तायडे यांनी दिली आहे.
याबाबतच्या अधिक माहितीसाठी लाभार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य इतर मागावर्गीय वित्त आणि विकास महामंडळ लिमिटेड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नासर्डी पुलाजवळ, नाशिक पुणे रोड, नाशिक कार्यालयात 0253-2236073 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच या एकरकमी व्याज परतावा योजनेचा लाभ घेवून लाभार्थ्यांनी थकीत मुद्दल व व्याज रक्कम एक रकमी भरणा करून कर्ज खाते बंद करून कर्ज मुक्त व्हावे व भविष्यातील होणारी संभावित कायदेशीर कार्यवाही टाळावी, असेही आवाहन जिल्हा व्यवस्थापक संजय तायडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.