इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन हा आपला गुरू असल्याचे सांगत एका सरकारी अधिकाऱ्याने चक्क ऑफिसमध्येच लादेनचा फोटो लावला आहे. उत्तर प्रदेशातील फारुखाबादमधील या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. यासंबंधीचा फोटो व्हायरल झाला असून त्याची देशभरात चर्चा होत आहेय
फारुखाबादमधील नवाबगंज येथील ऑफिसमध्ये ओसामाचा फोटो आहे ही बातमी व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. भारताचा शत्रू असलेल्या ओबामाचा फोटो कोणाला आणि का लावावा वाटला याची जोरदार चर्चा त्यामुळे सुरु झाली आणि हा फोटो कोणी लावला याची शोधाशोधदेखील सुरु झाली. नवाबगंज इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशन ऑफिस कॉम्प्लेक्सच्या वेटिंग रूमच्या भिंतीवर ओसामा बिन लादेनचा फोटो अधिकाऱ्याने लावल्याचे या शोधण्यात समोर आले.
फोटोच्या तळाशी आदरणीय ओसामा बिन लादेन हे जगातील सर्वोत्तम कनिष्ठ अभियंता आहेत असेदेखील लिहिलेले आहे आणि त्या खाली एसडीओ रवींद्र प्रकाश गौतम यांचे नाव लावण्यात आले आहे. गौतम यांनीच तो फोटो लावल्याचे समोर आले आहे.
याबाबत अधीक्षक अभियंता एस. के. श्रीवास्तव यांनी सांगितले की, या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या चौकशीनंतर अहवाल येईल आणि त्यावर अभ्यास करुन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे. भिंतीवरील फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. त्यानंतर लगेचच हा फोटो काढण्यात आला.
विशेष म्हणजे उपविभागीय अधिकारी रवींद्र प्रकाश गौतम यांना फोन केला असता त्यांनी लादेन हा आमचा गुरू असल्याचे उघडपणे सांगितले. जरी कोणी हा फोटो काढून टाकला तर मी लादेनचा दुसरा फोटो लावेल असेही त्याने सांगितले. यातून हा फोटो त्यानेच लावला असल्याचे स्पष्टीकरण स्वतःच दिले. तर दुसरीकडे अधीक्षक अभियंता यांनी याविषयीची सर्व माहिती वरिष्ठांना देण्यास सांगितले आहे.