नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्यामध्ये नागरिकांना सेवेचा हक्क देणारा क्रांतीकारी कायदा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015. या कायद्यान्वये राज्याच्या नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी सूनिश्चित करण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली. ‘आपली सेवा आमचे कर्तव्य’ हे ब्रीद वाक्य असलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागीय कार्यालयाची स्थापना 1 डिसेंबर, 2021 रोजी, नाशिक येथे झाली. स्थापने पासून राज्य सेवा हक्क आयोग, नाशिक महसूली विभाग नाशिक आयोगाच्या कामकाजास सुरुवात झाली असून गेल्या वर्षभरात आतापर्यंत नाशिक महसूली विभागात सेवा हक्क कायद्याखाली 30 लाख 60 हजार 260 अर्ज प्राप्त झाले असून 28 लाख 37 हजार 875 अर्ज निकाली काढून न्याय दिला आहे.
एप्रिल, 2015 पासून हा कायदा राज्यात लागू झालेला असून, शासनाच्या 38 विभागांनी सुमारे 500 सेवा या कायद्याखाली अधिसूचित केल्या आहेत. या सेवा देण्याची जबाबदारी शासकीय अधिका-यांवर आहे. त्यांनी वेळेवर सेवा न दिल्यास त्यांच्या वरिष्ठ अधिका-याकडे अपिल दाखल करता येते. नाशिक आयोगाने मागील एका वर्षात 33 अपिले निकाली काढून अर्जदारांना न्याय दिलेला आहे आणि कर्तव्यात कसूर करणा-या अधिका-यांना समज दिलेली आहे. यामध्ये विहीत कालमर्यादेत सेवा दिलेल्या प्रकरणांची टक्केवारी 93 टक्के आहे. तसेच सन 2022-23 या वर्षात या कायद्याच्या अनुषंगाने अपिलांव्यतिरिक्त सुमारे 15 तक्रारी अर्ज प्राप्त झाले असून सर्व अर्जांचा वेळेत निपटारा करुन नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात आले आहे.
या कायद्याअंतर्गत कोणत्या सेवा नागरिकांना प्राप्त करून घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे, ही माहिती ‘आर.टी.एस. महाराष्ट्रʾ’ या मोबाईल ॲप वर किंवा ‘आपले सरकार’ वेब पोर्टल वर उपलब्ध आहे. सेवा प्रदान करताना विलंब झाल्यास किंवा संयुक्तिक कारण नसताना सेवा नामंजूर करण्यात आली तर नागरिक प्रथम, द्वितीय अपील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व तिसरे आणि शेवटचे अपील आयोगाकडे दाखल करू शकतात.
या कायद्याचे ‘आपले सरकार’ नावाचे वेब पोर्टल आहे. नागरिक https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर जाऊन त्यांना हवी असणारी सेवा येथे शोधू शकतात किंवा ‘आपले सरकार’ मोबाईल ॲपचा जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेसाठी उपयोग करुन घ्यावा. या संदर्भात अधिक माहितीसाठी राज्य लोकसेवा हक्क आयुक्त कार्यालय, नाशिक विभाग, नाशिक दूरध्वनी क्रमांक 0253-2995080, ई-मेल आयडी rtsc.nashik@gmail.com किंवा सबंधित जिल्हाधिकारी, कार्यालय येथे संपर्क साधावा.
*“ नाशिक विभागीय कार्यालयाच्या पहिल्या आयुक्त म्हणून माझी नियुक्ती झाली आणि डिसेंबर, 2021 पासून राज्य सेवा हक्क आयोग,नाशिक महसूली विभाग, नाशिक आयोगाच्या कामकाजास सुरवात झाली. आयोगाच्या कार्यकक्षेत नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदूरबार हे पाच जिल्हे येतात. यापुढील काळात नागरिकांच्या गरजेच्या अधिकाधिक सेवा अधीसूचित करुन त्या ऑनलाईन उपलब्ध करणे आणि” या कायद्याचे महत्व प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे हे आयोगाचे उदिष्ट आहे.*
-चित्रा कुलकर्णी, आयुक्त राज्य सेवा हक्क आयोग,नाशिक
Government Office Work Complaint Aaple Sarkar