इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सर्वसामान्य माणसाचे सरकारी कार्यालयातील काम पहिल्याच प्रयत्नात झाले तर त्या दिवशी देश बदलला असे समजावे लागेल. उद्या या, ही कागदपत्रे जोडा, साहेब सुटीवर आहेत, अशी अनेक कारणे सांगितली जातात. अशाच प्रकाराला वैतागून एका सामान्य माणसाने रागारागात सरकारी अधिकाऱ्याच्या टेबलावरच साप सोडला.
तेलंगणातील हैदराबादच्या अलवाल भागातील ही घटना आहे. या घटनेचा व्हिडियो असा काही व्हायरल झाला की देशभरात त्याची चर्चा होऊ लागली. प्रत्येकाला हा प्रकार आपल्या जवळचा वाटला. सरकारी कार्यालयातील काम आले की लोक घाबरून जातात. कारण काम लवकर होणार नाही, याची त्यांना खात्री असते. कधी कर्मचारी सुटीवर असणार तर कधी साहेब सुटीवर असणार. कधी तर प्रत्येकवेळी नवा कागद जोडायला सांगणार. या संपूर्ण प्रकारात सामान्य माणसाची फरपट होते. याच त्रासाला कंटाळून एकाने अनोखे पाऊल उचलले.
संपूर्ण देशात सध्या पावसाने थैमान घातले आहे. तेलंगणा, हैदराबादमध्येही पावसाने कहर केला आहे. लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. एका व्यक्तीच्या घरात साप शिरल्यामुळे त्याने महापालिकेला वारंवार संपर्क केला. कार्यालयात जाऊन मदतीसाठी विनंती केली. पण कुणीही लक्ष द्यायला तयार नव्हते. अखेर त्या व्यक्तीने कसाबसा साप स्वतःच पकडला आणि थेट महापालिकेतील अधिकाऱ्याच्या टेबलवर नेऊन ठेवला. या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली. वॉर्ड अॉफीसमध्ये अधिकाऱ्याच्या टेबलवरच साप नेऊन सोडल्यामुळे इतर कर्मचारीही घाबरून गेले.
भाजप नेत्याने शेअर केला व्हिडिओ
महानगरपालिकेच्या वॉर्ड कार्यायातील हा प्रकार भाजप नेते विक्रम गौर यांनी व्हिडियो द्वारे शेअर केला आहे. त्यांनी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे सर्वसामान्य नागरिकांना किती त्रास होतो, याची कल्पना येईल असे म्हटले आहे. ‘साप सोडमारी व्यक्ती किती वैतागली असेल याची कल्पना करा. हैदराबादच्या जीएचएमसी वॉर्डमधील ही घटना आहे. एकाने अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे कंटाळून त्यांच्या टेबलवरच साप सोडला,’ असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.