नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बँकेमध्ये नोकरी मिळावी यासाठी आजच्या काळात अनेक तरुण प्रयत्न करतात ,त्यासाठी स्पर्धा परीक्षा देखील देतात परंतु अनेकांना यश येत नाही ,मात्र ज्यांना यश येते ते निश्चितच चांगल्या पदावर पोहोचतात .आता देखील बँकेत नोकरी करण्याची तरुणांना संधी प्राप्त झाली आहे.
नाबार्ड म्हणजेच नॅशनल बँक ऑफ अग्रिकल्चर अँड रुलर डेव्हलपमेंट माध्यमातून ही संधी तरुणांना मिळणार आहे नाबार्डने सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ज्यासाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट http://nabard.org ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 18 जुलैपासून सुरू झाली आहे. या पदांसाठी भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 ऑगस्ट 2022 निश्चित करण्यात आली आहे.
या करिता नाबार्डमार्फत जारी करण्यात आलेल्या भरती मोहिमेद्वारे 170 पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीअंतर्गत ग्रामीण विकास बँकिंग सेवेतील सहाय्यक व्यवस्थापक श्रेणी A ची 161 पदं, राजभाषा सेवेतील 7 पदं आणि प्रोटोकॉल आणि सुरक्षा सेवेतील 2 पदांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित विषयात किमान 60 टक्के गुणांसह पदवीधर असणं आवश्यक आहे.
नाबार्डअधिसूचनेनुसार, प्रोटोकॉल आणि सुरक्षा सेवेतील ग्रेड A पदांसाठी भरतीसाठी उमेदवाराचे वय 25 ते 40 वर्षे दरम्यान असावं. तसेच, इतर पदांसाठी उमेदवाराचे वय 21 वर्ष आणि कमाल वय 30 वर्ष निश्चित करण्यात आले आहे. या भरती अंतर्गत, उमेदवारांची प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे ग्रेड A च्या पदांवर भरतीसाठी निवड केली जाईल. या प्राथमिक परीक्षेत 200 गुणांचे 200 प्रश्न विचारले जातील आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी 120 मिनिटे मिळतील. या भरती मोहिमेसाठी, उमेदवारांना 800 रुपये अर्ज शुल्क भरावं लागेल. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार दि. 18 जुलै ते 7 ऑगस्ट 2022 पर्यंत अधिकृत वेबसाइट nabard.org वर जाऊन अर्ज करू शकतात.
Government Job Vacancy Recruitment Employment NABARD