मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी करिअरविषयक हेल्पलाईन लवकरच सुरू करणार आहोत, तसेच सर्व अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अल्पसंख्याक, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील प्रशिक्षणार्थी यांना ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखाच्या मर्यादेत आहे. त्यांना ५०० रूपये विद्यावेतन सप्टेंबर २०२३ पर्यंत सुरू करणार असल्याचे उत्तर कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानपरिषदेत दिले.
राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना करिअर विषयक संधीची माहिती देण्याकरिता कायमस्वरूपी हेल्पलाईन व ईमेल सुरू करण्याबाबत विधानपरिषद सदस्य उमा खापरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना मंगल प्रभात लोढा बोलत होते.
कौशल्यविकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर मेळावे राज्यात २८८ मतदारसंघातील २६० ठिकाणी शिबीर पार पडले. यामध्ये १ लाख ७४ हजार युवक युवतींनी सहभाग घेतला, यामध्ये १५ हजार ४९३ पालकांनी सहभाग घेतला. तसेच ज्या आस्थापनांमध्ये नोकरभरती होणार आहे, त्यासाठीदेखील समन्वय साधून रोजगाराची संधी निर्माण व्हावी, यासाठी जॉब कार्डबाबतही माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल. पुणे व ठाणे येथे इंडस्ट्री मीट घेतली होती, अशी माहिती कौशल्यविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. या चर्चेत विधानपरिषद सदस्य अभिजित वंजारी, विक्रम काळे यांनी सहभाग घेतला.
नंदूरबार व पालघर येथे लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
आरोग्यसेवांना बळकटी यावी याकरिता नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी व्हावी यासाठी शासनाकडून अतिदुर्गम भागातही नंदूरबार व पालघर येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे, असे उत्तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिले. नंदूरबार आणि पालघर जिल्ह्यांत विशेषोपचार रूग्णालय सुरू करण्याबाबत विधानपरिषद सदस्य आमश्या पाडवी यांनी प्रश्न विचारला होता त्याला उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, राज्य शासनाने निवडलेल्या नंदुरबार आणि पालघर जिल्ह्यांत वैद्यकीय महाविद्यालयांचे बांधकाम तसेच श्रेणीवर्धनसाठी आशियाई विकास बँकेकडून ४१०० कोटी रूपयांचा निधी मिळणार आहे. लवकरच या रूग्णालयांचे बांधकाम पूर्ण करणार असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.