मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना त्यांची जात विचारण्याचा प्रकार जातीभेदाला खतपाणी घालणारा, घटनाविरोधी, मानवताविरोधी, राज्य शासनाची असंवेदनशीलता, आजारी मानसिकता दाखवणारा आहे. शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला त्याची जात विचारली जावू नये. मनमाड उपजिल्हा रुग्णालयासह राज्यात अन्यत्र कुठेही असे प्रकार सुरु असतील तर ते तात्काळ थांबवावेत, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील मनमाड उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना त्यांची जात विचारली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयांमध्ये रुग्णांची माहिती भरण्याच्या ‘केसपेपर’मध्ये जातीचा रकाना असून त्याठिकाणी जात लिहिणे बंधनकारक असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भातील बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. रुग्णांना त्यांची जात विचारुन नंतर उपचार करण्याचा प्रकार, जातीभेदाला खतपाणी घालणारा, घटनाविरोधी, मानवताविरोधी, शासनाची असंवेदनशीलता, आजारी मानसिकता दाखवणारा असल्याचे सांगत अजित पवार यांनी त्याला विरोध केला आहे.
शासकीय किंवा खाजगी कोणत्याही रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला त्याची जात विचारली जावू नये. मनमाड उपजिल्हा रुग्णालयासह राज्यात अन्यत्र कुठेही असे प्रकार सुरु असतील तर ते तात्काळ बंद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी संबंधितांना द्यावेत, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयातही रुग्णांना जात विचारण्याचा प्रकार यापूर्वी घडला होता. शेतकऱ्यांना खतखरेदी करण्यासाठीही जात सांगणे अलिकडे बंधनकारक केले होते. त्यावेळीही भविष्यात असे प्रकार थांबवण्याचा आम्ही सरकारला इशारा दिला होता. त्यानंतरही हा प्रकार घटला असल्याकडेही अजित पवार यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.
अलिकडच्या काळात अनेक ठिकाणी गरज नसताना नागरिकांना त्यांची जात विचारण्याचा घटना वाढत आहे राज्यसरकारने या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन हे प्रकार थांबवावेत. समाजात जातीभेद निर्माण करण्यास प्रोत्साहन देऊ नये, असे आवाहन अजित पवार यांनी सरकारला केले आहे.
Government Hospital Patient Cast Ajit Pawar