अहमदनगर (जिमाका वृत्तसेवा) – शासकीय कर्मचाऱ्यांनी 14 मार्च, 2023 पासून बेमुदत संप पुकारलेला आहे. या संप काळात सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या. तसेच अत्यावश्यक सेवा नियमितपणे सुरू राहतील याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपाच्या अनुषंगाने सर्व विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. सालीमठ बोलत होते. शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभागी होणे, ही बाब गैरवर्तणूक असल्याची सूचना सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात यावी. संप काळात संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यास कार्यालयाकडून कारणे दाखवा नोटीस काढण्यात यावी. कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी न होता, नेहमीप्रमाणे कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करावा. संप काळात कार्यालय नियमित वेळेवर उघडण्याची व बंद करण्याची योग्य ती व्यवस्था करावी व ती व्यवस्था जबाबदार अधिकारी यांचेकडे दयावी. आवश्यकता भासल्यास गृहरक्षक, पोलिस दलाची मदत घ्यावी.
शासकीय कर्मचा-यांच्या संपाबाबत केंद्र शासनाचे काम नाही वेतन नाही हे धोरण राज्य शासनही अनुसरत असल्याने कर्मचा-यांना अवगत करण्यात यावे, असेही श्री. सालीमठ यांनी यावेळी सांगितले. शासनाच्या सेवा महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा अधिनियमांतर्गत घोषित करण्यात आल्या आहेत अशा सेवा विनखंडीत सुरू राहतील याची काळजी घ्या.
रुग्णालये, पाणी पुरवठा, स्वच्छता यासह जनतेशी निगडीत सर्व सेवा सुरळीत सुरू राहतील यादृष्टीने नियोजन करा. सध्या 10 वी व 12 वी च्या परीक्षा सुरू असून या परीक्षांमध्ये कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी शिक्षण विभागाने पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध करावे. विभाग प्रमुखांनी कोणत्याही कर्मचाऱ्यांना कुठलीही रजा मंजूर करू नये. जनतेला सेवा मिळण्यात अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी श्री.सालीमठ यांनी यावेळी दिल्या.
https://twitter.com/InfoAhmednagar/status/1635304663154319362?s=20
Government Employee Strike Ahmednagar Collector Order