मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अनेक मोबाईलवर एक इमर्जन्सी अलर्ट आला. या अलर्टमुळे अनेक जण गोंधळून गेले. काही जण घाबरले तर काहींनी मोबाईल रिस्टार्ट केला. त्यानंतरही त्यांना हा अलर्ट आला. त्यामुळे सर्वत्र त्याची चर्चा होत आहे. यासंदर्भात आता मोठा खुलासा झाला आहे.
भारतीय दूरसंचार विभागाच्यावतीने हा अलर्ट जारी करण्यात आला होता. देशभरातील लाखो नागरिकांच्या स्मार्टफोनवर सकाळी सव्वा दहाच्या सुमारास हा अलर्ट आला. संकटकाळात देशवासियांना एकाचवेळी तातडीची सूचना किंवा अलर्ट देण्याची चाचणी यामाध्यमातून करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारचा अलर्ट तातडीने देणे शक्य होणार आहे. आजची ही चाचणी यशस्वी झाल्याचे सांगितले जात आहे.
ज्यावाळी हा अलर्ट आला त्यावेळी अनेक जण गोंधळून गेले. या अलर्टमध्ये लिहिले होते की,
Emergency Service Alert Here
This is Test Alert from Department of Telecommunication, Government of India
20.07.2023. 10.20 AM
OK
राज्याच्या अनेक भागात आज अतिवृष्टीचा अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे त्यासंबंधीचा हा काही अलर्ट आहे का, अशी शंका अनेकांना निर्माण झाली. त्यानंतर काहींनी या अलर्टचे स्क्रीनशॉट काढले. काहींनी ओके वर क्लिक केले. काही व्यक्तींना २ वेळा तर काहींना तीन वेळा हा अलर्ट आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परदेशात अशा प्रकारची अलर्ट यंत्रणा आहे. अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशात ती राबविली जाते. एखा क्षणात लाखो लोकांना अलर्ट पाठविला जातो. मानवी किंवा नैसर्गिक आपत्ती किंवा विशिष्ट स्वरुपाचा हा अलर्ट देऊन अनेकांचे प्राण वाचविले जातात. तसेच, योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या जातात. हा अलर्ट म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाचा एक भाग आहे.