नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अटल भूजल योजनेंतर्गत गावांमध्ये लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन हे ब्रीद साध्य होण्यासाठी भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतध्ये सहभाग घेण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव 25 एप्रिल पर्यंत सादर करावा, असे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल यांनी कळविले आहे.
जिल्हा व राज्यस्तरावर उत्कृष्ठ काम करणाऱ्या गावांना प्रोत्साहन निधी, प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम येणाऱ्या गावाला 50 लाख, द्वितीय 30 लाख व तृतीय बक्षीस 20 लाख रूपये आहे. राज्यामध्ये भूजल उपश्याचे प्रमाण अधिक असून यामध्ये प्रामुख्याने नगदी पिकांच्या सिंचनासाठी भूजलाचा उपसा अधिक होतो. त्यामुळे अशा भागातील पाणलोट क्षेत्र हे अतिशोषित, शोषित व अंशत: शोषित या वर्गवारीत समाविष्ठ होते. भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे पाणी पातळीत होत असलेली घसरण व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबविण्यासाठी अटल भूजल योजना राबविण्यात येते.
केंद्र सरकार व जागतिक बँक अर्थसहाय्यित अटल भूजल योजना जिल्ह्यातील 116 ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येते. याबाबत गावांमध्ये पर्यावरण रिसोर्स सेंटर (परिस) संस्थेमार्फत प्रबोधनाचे काम सुरू आहे. ही स्पर्धा 2022-23 व 2023-24 या दोन वर्षांसाठी राबविण्यणत येणार आहे.
या योजनेत समाविष्ठ असलेल्या सर्व गावांनी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांच्याकडील पाणीपुरवठा व स्वच्छता समितीमार्फत ठराव करून ठरावाच्या प्रतींसह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, नाशिक यांच्याकडे विहित मुदतीत सादर करावा. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गावांची निकषांनुसार तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय समितीमार्फत मुल्यांकनाद्वारे होणार आहे, असेही वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल यांनी कळविले आहे.
Government Competition 50 Lakh Prize for Village