नवी दिल्ली – खेड्या-पाड्यांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत सोन्याची दागिने खरेदी करणार्या ग्राहकांना नेहमीच सोन्याची शुद्धता आणि त्याच्या दरांबद्दल तक्रारी असतात. दुकानदार १८ कॅरेटचे दागिने देऊन २२ कॅरेटचे पैसे वसूल करतात. त्याचा ग्राहकांना पत्ता लागत नाही. परंतु आता ग्राहकांची अशी फसवणूक होणार नाही. देशातील २५६ जिल्ह्यांमध्ये दागिन्यांना हॉलमार्किंग लागू करण्यात आली आहे. अशा दागिन्यांवर सोन्याच्या शुद्धतेचा उल्लेख असेल. दरम्यान, हॉलमार्किंगमुळे ग्राहकांना आर्थिक झळ बसणार नाही असे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात ग्राहकांना त्याचा भार सोसावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
हॉलमार्क म्हणजे काय
हॉलमार्किंग म्हणजे सोन्याच्या शुद्धतेचा पुरावा होय. एक गुणवत्ता प्रमाणपत्र होय. देशातील २५६ जिल्ह्यांमध्ये २३ जून २०२१ पासून १४, १८ आणि २२ कॅरेट सोन्याच्या आभूषणांसाठी हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले आहे. भारतात सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंगची सुरुवात २००० पासून झाली. सोने आंतरराष्ट्रीय मानकांमध्ये बसते का हे हॉलमार्कच्या निशाणावरून कळते. केंद्र सरकारच्या ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड म्हणजेच भारतीय मानक संस्था (बीआयएस) या संस्थेकडून हॉलमार्क जारी केले जाते. दागिने खरेदी करताना पक्की पावती घ्यावी असा सल्ला पारदर्शी व्यवसाय करणारे व्यावसायिक देतात. त्यामध्ये एचयूआयडी नंबरसह दागिन्यांच्या गुणवत्तेचा सर्व तपशील असावा.
४.५ कोटी दागिन्यांची हॉलमार्किंग
हॉलमार्कचा नियम लागू झाल्यानंतर भारतीय मानक संस्थेत नोंदणीकृत ज्वेलर्सची संख्या चौपट झाली आहे. हॉलमार्क दागिन्यांची विक्री करण्यासाठी आतापर्यंत १.२७ लाख ज्वेलर्सनी बीआयएसकडे नोंदणी केली आहे. देशात ९७६ बीआयएस मान्यताप्राप्त एएचसी आहेत. देशात ऑटोमेशन सॉफ्टवेअर आल्यानंतर पाच महिन्यांत जवळपास ४.५ कोटी दागिन्यांची हॉमार्किंग करण्यात आली आहे.
कारागिरांची मजुरी वाढली
हॉलमार्किंग हा सोने पूर्ण शुद्ध असल्याचा पुरावा आहे. एक डिसेंबरपासून प्रत्येक दागिन्याचे हॉलमार्किंग १ डिसेंबरपासून अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे सोने कारागिरांनी मजुरी शुल्क वाढवले आहे. परिणामी सोन्याचा दागिना प्रतिग्रॅमला ५० ते १०० रुपयांनी महागला आहे. याचा भार थेट ग्राहकालाच सोसावा लागत आहे. १० ग्रॅमचा दागिना घेतला तरी ग्राहकांना आता जवळपास १ हजार रुपये अधिक मोजावे लागत आहेत.