शासकीय दाखला घेण्यासाठी ई केंद्र सुविधा
दहावी-बारावीचे नुकतेच निकाल लागले आहेत. निकालानंतर पुढील शैक्षणिक कामांसाठी लागणाऱ्या दाखल्यांकरिता विद्यार्थी व पालकांची लगबग सुरु झाली आहे. तहसिल कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये, सेतू केंद्र, आपले सरकार पोर्टल केंद्र अशा ठिकाणच्या वाऱ्या पालकांना सतत कराव्या लागतात. एप्रिल ते जुलैअखरे डोमिसाईल, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर व रहिवासी, आदी स्वरूपाचे विविध दाखल्यांसाठी पालक आणि विद्यार्थ्यांच्या फेऱ्या चालू राहतात.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या दाखल्यांसाठीही शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागतात. अशावेळी दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये त्रूटी आढळल्यातर पुन्हा फेऱ्या वाढतात. यामुळे वेळेसोबत विनाकारण आर्थिक नुकसानही होते. पालक आणि विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, त्यांची दलांलामार्फत फसवणूक होऊ नये यासाठी शासनाने ई-सेवा केंद्र, आपले सरकार, सेतु यासारख्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. या सेवांमुळे शासकीय दाखले मिळणे सोपे झाले आहे.
नागरिकांच्या सुविधेसाठी शासनाने विविध सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. परंतु नागरिकांनी ही आपल्या काही जबाबदाऱ्या, काही कर्तव्ये पारपाडणे आवश्यक आहे. शैक्षणिक कामांसाठी, विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी, नोकरी संदर्भात आवश्यक असलेले दाखले काढण्यासाठी शासनाच्या नियमावलीनूसार आवश्यक कागदपत्रे आपण आधीच तयार ठेवली. तर दाखले काढताना लागणारा वेळ वाचेल, आर्थिक नुकसानही होणार नाही. विनाकारण छोट्या छोट्या कागदपत्रांसाठी माराव्या लागणाऱ्या फेऱ्याही वाचतील. शैक्षणिक तसेच नोकरी संदर्भात लागणारे विविध दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी (चेकलीस्ट) पुढील प्रमाणे आहे.
शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे
उत्पन्न दाखला (1 वर्षे) : तलाठी रहिवाशी दाखला, तलाठी उत्पन्न दाखला, शेती असलेस 7/12 उतारा व 8 अ, नोकरी असलेस पगार दाखला, पेन्शन असलेस पासबुक झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स, आधारकार्ड झेरॉक्स, फोटो.
उत्पन्न दाखला नॉन क्रिमीलेयर :- तलाठी रहिवाशी दाखला, तलाठी 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, शेती असलेस 7/12 उतारा व 8 अ, नोकरी असलेस पगार दाखला, पेन्शन असलेस पासबुक झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स, आधारकार्ड झेरॉक्स, फोटो.
उत्पन्न दाखला सरकारी योजना/ वैद्यकिय कामी :- तलाठी रहिवाशी दाखला, तलाठी उत्पन्नाचा दाखला, मंडळ अधिकारी (सर्कल) चौकशी अहवाल, शेती असलेस 7/12 उतारा व 8 अ, रेशन कार्ड झेरॉक्स, आधारकार्ड झेरॉक्स, फोटो.
दुबार /हरवलेले रेशनकार्ड : धान्य दुकानदार यांचा रेशनकार्ड खराब/ हरवलेचा दाखला, तहसीलदार यांच्या सहिने उत्पन्न दाखला, हरवलेले असल्यास पोलीस स्टेशनचा दाखला, खराबसाठी मुळ रेशनकार्ड/ हरवलेले असल्यास झेरॉक्स, सर्वांची आधारकार्ड झेरॉक्स.
नॉन क्रिमीलेयर : तहसीलदार उत्पन्न दाखला (3 वर्षाच्या उत्पन्नासहीत), जातीच्या ‘ड’ दाखल्याची झेरॉक्स रेशन कार्ड झेरॉक्स, आधारकार्ड झेरॉक्स, फोटो.
डोमेसाईल/डोंगरीदाखला/स्थानिक रहिवाशी दाखला(SEC) : तलाठी रहिवाशी दाखला, शाळा सोडलेचा दाखला/ जन्मनोंद, दहावी किंवा बारावी प्रमाणपत्र/मार्कलिस्ट, रेशन कार्ड झेरॉक्स, आधारकार्ड झेरॉक्स, फोटो.
गॅझेट (राजपत्र) : नावात बदल वेगळी नावे असणारे दोन पुरावे, उदा. मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, 7/12 किंवा 8 अ उतारे, ॲफिडेव्हीट, इतर, जन्मतारखेत बदल : जुनी जन्म तारीख व नविन जन्म तारीख यांचे पुरावे व मतदान ओळखपत्र, आधारकार्ड झेरॉक्स इत्यादी
रेशनकार्डवर नाव वाढवणे : मुलांची नावे वाढवण्यासाठी – जन्म दाखला, बोनाफाईड, आधारकार्ड झेरॉक्स, स्वत:चे रेशनकार्ड, पत्नीचे नावे वाढवण्यासाठी -विवाह नोंद दाखला व जुन्या रेशनकार्ड मधील नाव कमी केलेचा दाखला. (पत्नी तालुक्याच्या बाहेरची असेल तर नाव कमी केलेचा दाखला किंवा पत्नी तालुक्यातील असेल तर माहेरचे रेशनकार्ड) आधारकार्ड झेरॉक्स व स्वत:चे रेशनकार्ड.
जातीचा दाखला : तलाठी रहिवाशी व जातीचा दाखला, अर्जदार शाळा सोडलेचा दाखला, जन्म नोंद दाखला किंवा बोनाफाईड, वडील, आजोबा, पणजोबा, चुलत आजोबा, चुलत पणजोबा, यांचा शाळा सोडलेचा दाखला, जन्म नोंद दाखला किंवा बोनाफाईड (मयत असल्यास मृतयुनोंद) सदर दाखल्यावर जातीचा उल्लेख असणे आवश्यक आहे, ओबीसी साठी 1967 पूर्वीचा जात पुरावा, एसबीसीसाठी 1961 पूर्वीचा जात पुरावा, व्हीजेएनटीसाठी 1961 पूर्वीचा जात पुरावा, एस.सी. साठी 1950 पूर्वीचा जात पुरावा, कुणबीसाठी 1920 ते 1930 मधील पुरावा, पोलीस पाटील व सरपंच यांचे सहीने वंशावळ, सरळ वंशावळ नसल्यास महसूली पुरावे, रेशनकार्ड झेरॉक्स, आधारकार्ड झेरॉक्स, फोटो.
आधारकार्ड : नवीन -18 वर्षावरील : मतदान ओळखपत्र व रेशनकार्ड 5 ते 18 वर्षामधील : जन्म नोंद दाखला/ बोनाफाईड, ग्रामपंचायत रहिवाशी दाखला व रेशनकार्ड.5 वर्षाखालील : जन्म नोंद दाखला किंवा बोनाफाईड, आई/वडिलांचे आधारकार्ड
दुरुस्ती – विवाहानंतर असेलतर : जुने आधारकार्ड फोटो लावून ग्रामपंचायत रहिवाशी दाखला (फोटोवर गोल शिक्का मारुन व रेशनकार्ड) नाव, पत्ता किंवा जन्मतारीख : फोटोलावून ग्रामपंचायत रहिवाशी दाखला, पॅनकार्ड, बोनाफाईड/ जन्म दाखला व रेशनकार्ड.
पॅनकार्ड : 2 फोटो, आधारकार्ड झेरॉक्स, जन्मतारखेचा पुरावा, (जन्मनोंद/ दहावी बोर्ड सर्टिफिकेट/ॲफिडेव्हीट) (टिप : आधारकार्डवर संपूर्ण जन्मतारीख असलेस जन्मतारखेचा पुरावा लागत नाही)
नविन किंवा विभक्त रेशनकार्ड : स्वत:चे नावे घरठाण उतारा, स्वत:चे नावे घरपटटी पावती, स्वत:चे नावे लाईट बील, तहसिलदार यांच्या सहीचा उत्पन्न दाखला, धान्य दुकानदार यांचा विभक्त असलेला दाखला, पोलीस पाटील यांचा विभक्त असलेला दाखला, जुन्या रेशनकार्डची झेरॉक्स, 100 रु. स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र (आई-वडीलांच्या रेशनकार्डमध्ये किमान एक मुलगा तरी राहिला पाहिजे, जर मुलगा विभक्त किंवा नविन रेशनकार्ड दिले जाणार नाही.)
रेशनकार्डवरील नाव कमी करणे : मयत नाव कमी करणेसाठी मृत्यु नोंद दाखला व मूळ रेशनकार्ड, विवाह झालेले नाव कमी करणेसाठी विवाह नोंद दाखला व मूळ रेशनकार्ड, नोकरी किंवा इतर कारणास्तव नाव कमी करणेसाठी तेथील तलाठी रहिवाशी दाखला किंवा नोकरीचे पत्र व मूळ रेशनकार्ड.
शासनाने नागीरकांना त्रास होऊ नये यासाठी विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. ई-सेवाकेंद्र, आपले सरकार, सेतु या सारख्या सुविधा नागरिकांच्या उपयोगासाठी आहेत. या सुविधा केंद्रांवर काही अडचणी आल्या तर त्यासाठी तक्रार केंद्र देखील आहेत. नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा. विनाकारण दलालांकडे पैसे घालवू नये अशा सुचना शासन वारंवार देत असते. वर नमूद दाखल्यांसाठी लागणारी कागदपत्रे (चेकलीस्ट) तयार ठेवली तर, भविष्यात दाखले मिळवताना वेळेची व पैशाची बचत होईल, आवश्यक असणारी कागदपत्रे अगोदरच तयार करुन ठेवणे अधिक हिताचे आहे.
- विभागीय माहिती कार्यालय, कोकण भवन, नवी मुंबई