नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य मोल मिळवून देण्यात मदत करण्याकरिता आणि ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत टोमॅटोची उपलब्धता सुनिश्चित करण्याकरिता टोमॅटो मूल्यसाखळी वाढविण्यासंदर्भात अभिनव कल्पना आमंत्रित करण्यासाठी, ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी टोमॅटो ग्रँड चॅलेंज हॅकेथॉनची घोषणा केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या नवोन्मेष शाखेच्या सहकार्याने ग्राहक व्यवहार विभागाने या हॅकेथॉनची आखणी केली आहे.
टोमॅटो मूल्यसाखळीत हस्तक्षेपाची लक्ष्यीत क्षेत्रे आणि व्यापकता यावर या उपक्रमात अभिनव कल्पना मागवण्यात आल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांसाठी पीक लागवड आणि बाजारपेठेचे ज्ञान, फळ अधिक काळ टिकू शकेल अशा योग्य जाती (खुल्या परागकण जाती किंवा संकरित), प्रक्रियेसाठी खास योग्य असलेल्या जाती, फळ अधिक काळ टिकावे यासाठी हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूल्यवाढ, ताज्या आणि प्रक्रियाकृत उत्पादनासाठी सुधारित वाहतूक, अभिनव पॅकेजिंग आणि साठवणूक यांचा समावेश आहे.
हॅकाथॉनसाठी प्रवेशिका दोन वर्गवारीत आमंत्रित करण्यात येत आहेत. (i) विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक आणि (ii) उद्योजक, भारतीय स्टार्ट-अप्स, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, मर्यादित दायित्व भागीदारी व्यावसायिक (LLPs). हॅकेथॉनमध्ये सहभागी होऊ इच्छिणारे https://doca.gov.in/gtc/index.php या पोर्टलवर अर्ज करू शकतात.
टोमॅटोचे उत्पादन भारतातील जवळपास सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात होते. सर्वाधिक उत्पादन दक्षिण आणि पश्चिम भारतात होते. ते एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या 56%-58% आहे. दक्षिण आणि पश्चिम क्षेत्रात अतिरिक्त उत्पादन होत असल्याने हे उत्पादन हंगामानुसार इतर बाजारपेठांना पुरवठा करतात.