मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणी घेण्याचे निर्दश दिले आहेत. राज्यपालांनी काढलेल्या आदेशात मात्र, महाविकास आघाडी सरकारला चांगलेच खिंडीत गाठले आहे. परिणामी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांची परीक्षा होणार आहे. राज्यपालांनी नेमके काय आदेश काढले आणि त्यामुळे ठाकरे सरकारची कशी कसोटी लागणार आहे, हे आपण आता जाणून घेऊ
राज्यपाल आदेशात नमूद करतात की, राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून सरकारला सभागृहाचा पाठिंबा आणि विश्वास आहे की नाही याची खात्री करण्याचा मला अधिकार आहे. त्यामुळे मी विशेष अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी बहुमत सिद्ध करावे असे निर्देश देतो, आणि उद्या सकाळी ११ वाजता विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे, या अधिवेशनात राज्य सरकारनं बहुमत सिद्ध करावे, विधानसभेचे कामकाज कोणत्याही परिस्थितीमध्ये संध्याकाळी ५ वाजता समाप्त व्हावे, असेही या पत्रात म्हटले आहे.
बहुमत चाचणी घेण्यासाठी विशेष अधिवेशन घेत असताना काही नियम व अटी राज्यपालांनी घातल्या आहेत. त्या अशा …
– राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन उद्या गुरुवार दि. ३० जून २०२२ रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात येऊन यात फक्त सरकारच्या बहुमत चाचणीची प्रक्रिया घेतली जावी. इतर कोणताही अजेंडा असू नये.
– राज्यातील काही नेत्यांकडून करण्यात आलेल्या आक्रमक वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर विधान भवनाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात यावा. संपूर्ण प्रक्रियेवेळी कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल याची संपूर्ण काळजी घेतली जावी.
– बहुमत चाचणीच्या प्रक्रियेचे लाइव्ह टेलिकास्ट म्हणजे थेट प्रक्षेपण करण्यात यावे आणि त्यासाठीची सर्व व्यवस्था उपलब्ध केली जावी.
– मतदानाची प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी मतमोजणी शिरगणती पद्धतीने घ्यावी. यात प्रत्येक सदस्याला त्याच्या जागेवर उभे राहून त्याची गणती केली जावी आणि सदस्याच्या जागेवर जाऊन त्याची मोजणी केली जावी.
– विशेष अधिवेशनाची संपूर्ण प्रक्रिया आणि बहुमत चाचणी उद्याच पूर्ण केली जावी. अधिवेशन कोणत्याही पद्धतीनं स्थगित करता येणार नाही.
– महत्वाचे म्हणजे उद्याच्या संपूर्ण अधिवेशनाचे स्वतंत्र एजन्सीच्या माध्यमातून व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात यावे, याची संपूर्ण जबाबदारी विधानसभेच्या सचिवांची राहील. याचं संपूर्ण फुटेज राजभवनात म्हणजे राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात यावे.
Governer Koshyari order Majority Test Maharashtra Political Crisis MVA Government