इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्र सरकारने जनगणनेसाठी राजपत्र अधिसूचना आज जाहीर केली. २०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेची आणि पहिल्यांदाच समाविष्ट झालेल्या जातनिहाय जनगणना त्यामुळे आता होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल दिल्लीत यासंदर्भातल्या तयारीचा आढावा घेतला होता.
देशभरात ३४ लाख प्रगणक आणि निरीक्षक, एक लाख तीन हजारांहून जास्त अधिकारी आधुनिक मोबाईल डिजिटल प्रणालीद्वारे या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घरांची यादी, मालमत्ता आणि सुविधा या माहितीचं संकलन, दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्याशास्त्रीय, सामाजिक-आर्थिक आणि जात विषयक माहिती संकलित करण्यात येणार आहे.
या प्रक्रियेमध्ये डिजिटल ॲप आणि स्व-गणनेची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. देशातल्या बर्फाळ प्रदेशात एक ऑक्टोबर २०२६ पासून, तर इतर भागात एक मार्च २०२७ पासून जनगणना सुरू होणार आहे.