नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारत सरकारने वैध मापनशास्त्र (पाकिटबंद वस्तूमाल – Packaged Commodities) नियम, 2011 मधील सुधारणा लागू करण्यासाठी नवी सुधारित कालमर्यादा जाहीर केली आहे. या नियमांची सुरळीत अंमलबजावणी व्हावी, यासाठी अधिसूचनेच्या तारखेपासून किमान 180 दिवस इतक्या संक्रमण कालावधीच्या अधीन राहून शिक्काकरणाच्या (लेबलिंगच्या) तरतुदींसंबंधीची कोणतीही सुधारणा 1 जानेवारी किंवा 1 जुलैपासून लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अमंबलजावणीच्या या कार्यपद्धतीमुळे उद्योग व्यवसायिकांना नव्या बदलांशी जुळवून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.
या निर्णयामधून केंद्र सरकारची ग्राहक कल्याणा प्रति वचनबद्धता दिसून येते, आणि त्याच वेळी उद्योग व्यवसायांवरचा अनुपालनाचा भार कमी करत व्यवसाय सुलभता सुनिश्चित करण्याचा सरकारचा प्रयत्नही दिसून येतो. असामान्य किंवा अपवादात्मक परिस्थितीत, या सुधारणांच्या अंमलबजाशी संबंधित निर्णय हे प्रकरण निहाय घेतले जाण्याची शक्यता आहे, मात्र त्याचवेळी सार्वजनिक हिताशी कोणतीही तडजोड न करता वेळेवर आणि व्यावहारिक तोडगा काढला जाईल याचीही सुनिश्चिती केली जाणार आहे.
वैध मापनशास्त्र (पाकिटबंद वस्तुमाल – Packaged Commodities) नियम, 2011 व्यापार आणि वाणिज्य क्षेत्राअंतर्गत निष्पक्षता, पारदर्शकता आणि ग्राहक संरक्षणाची सुनिश्चित करण्याच्यादृष्टीने सर्वात महत्वाची भूमिका बजावणारा नियम आहे. या नियमांनुसार ग्राहकांना संबंधित वस्तुमालाचे निव्वळ प्रमाण, त्याची कमाल किरकोळ किंमत (MRP), उत्पादन घेतल्याची तारीख, उत्पादनाचा मूळ देश आणि उत्पादकाचे तपशील ही आणि अशाप्रकारची महत्वाची माहिती सुलभरित्या उपलब्ध होईल याची सुनिश्चिती करण्याच्या उद्देशाने पाकिटबंद वस्तुमालवर स्पष्ट, सुयोग्य आणि प्रमाणित शिक्काकरण (लेबलिंग) बंधनकारक केले गेले आहे. या नियमामुळे ग्राहकांना संबंधित वस्तूमालाविषयी पूर्ण माहिती घेऊन त्या आधारे खरेदी विषयीचा निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती होते. एका अर्थाने यामुळे व्यापार आणि वाणिज्य क्षेत्राअंतर्गतची विश्वासार्हतेची संस्कृतीही वाढीला लागते.
या नियमांअंतर्गत ग्राहकांचे हितसंबंध आणि उद्योग व्यवसायाच्या गरजांमध्ये योग्य समतोल साधला गेला आहे. त्याचप्रमाणे या नियमांमध्ये वाद आणि कायदेविषयक अस्पष्टतेसारख्या परिस्थितीच्या शक्यतेचे प्रमाण कमी करण्यासाठी अनुपालनाशी संबंधित स्पष्टताही दिली गेली आहे. वैध मापनशास्त्र (पाकिटबंद वस्तूमाल – Packaged Commodities) नियम, 2011 हा निष्पक्ष बाजारपेठांना चालना देणे, ग्राहकांचे सक्षमीकरण करणे आणि नितीमुल्याधारीत व्यापारविषयक कार्यपद्धतींना प्रोत्साहन देण्याच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे.
ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे आणि त्याचवेळी उद्योगक्षेत्रातील भागधारकांवरचा अनुपालनाचा भार कमी करून व्यवसाय सुलभतेचेही उद्दष्ट साध्य करणे अशा दोन्हीमध्ये समतोल साधण्याप्रती केंद्र सरकारची वचनबद्धताच या निर्णयातून दिसून येत आहे.